‘आंद्रा’ ओव्हरफ्लो; ‘वडिवळे’ ९० टक्के

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

तळेगाव दाभाडे (स्टेशन) - आंदरमावळ आणि हवेली तालुक्‍याला वरदान ठरलेले मंगरुळ येथील आंद्रा धरण १०० टक्के भरले असून, त्याच्या सांडव्यावरून बुधवारी (ता. १९) सकाळी पाणी वाहण्यास सुरवात झाली. मावळ तालुक्‍यातील धरणांपैकी हे धरण प्रथमच भरले आहे. गेल्या वर्षी हे धरण सात ऑगस्ट रोजी भरले होते. धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे.

याबाबत आंद्रा धरण प्रकल्पाचे शाखा अभियंता अनंता हांडे म्हणाले, ‘‘धरण परिसरात मंगळवारपर्यंत (ता. १८) ८०१ मिलिमीटर पाऊस झाला. धरण जलाशय पातळीत ६१४.२२ मीटर वाढ झाली आहे. धरणात एकूण पाणीसाठा ८३.३० दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त पाणीसाठा ८२.७४ दशलक्ष घनमीटर झाला आहे. पावसाचा जोर कायमअसल्याने नदीकाठच्या गावांनी दक्षता पाळावी. या धरणाच्या पाण्याचा उपयोग तळेगाव एमआयडीसी, पूर्व भागातील शेतीच्या सिंचनासाठी तसेच देहू-आळंदी येथील यात्रा काळात भाविकांच्या सोयीसाठी होतो. आंद्रा धरणाचे पाणी वारंगवाडी येथे इंद्रायणी नदीला मिळते, नंतर भीमा नदीला मिळून उजनी धरणात जाते. सध्या हौशी पर्यटक धबधबे व धरण परिसरात सेल्फी काढत असल्याने अपघात घडतात. त्या पार्श्‍वभूमीवर धरण परिसरात पर्यटकांना, खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच धरणाच्या कठड्याजवळ थांबून सेल्फी काढण्यास मनाई करण्यात आली आहे.’’

१६८३ मिलिमीटर पाऊस
कामशेत  ः नाणेमावळातील वडिवळे धरण ९० टक्के भरले असून, ५६१ क्‍युसेकने पाचही मोऱ्यांद्वारे पाणी बुधवारी सकाळी सोडण्यात आले.  गेल्या आठ दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, एकूण १६८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातून पाणी सोडल्याने नदीकाठच्या लोकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वडिवळे शाखा अभियंता रवी जाधव यांनी केले आहे. जाधव म्हणाले, की पावसाच्या प्रमाणात रोज वाढ होत असल्याने या पुढेदेखील कुठल्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्यात येईल. खबरदारी म्हणून संबंधित ग्रामपंचायतींना पत्रे दिली आहेत. 

Web Title: pune news dam rain andhra dam