हॅलो, तुमचे डेबिट कार्ड बंद होणार आहे!

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

‘आयटी हब’ असलेल्या पुण्यात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बॅंकेच्या डेबिट, क्रेडिट कार्डवरून, कार्डचे क्‍लोनिंग करून, मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरुन लग्नाचे आमिष दाखवून, तर कधी नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाइन पैसे उकळण्याच्या घटना शहरात दररोज घडत आहेत. गुन्हेगार दुसऱ्या शहरात, परदेशात बसून संगणकाच्या मदतीने नागरिकांची फसवणूक करीत आहेत. थोडी सतर्कता दाखवली, तर अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू शकत नाही. यासंदर्भात जनजागृतीसाठी ही वृत्तमालिका

पुणे - वरुणला अनोळखी व्यक्‍तीचा फोन आला...‘एचडीएफसी बॅंकेतून बोलत आहे, तुमचे डेबिट कार्ड बंद होणार आहे.’ त्यावर गडबडलेला वरुण म्हणाला, ‘कार्ड सुरळीत सुरू राहण्यासाठी काय करावे लागेल.’ समोरून अनोळखी व्यक्‍ती म्हणाली, ‘तुम्ही डेबिट कार्डचे डिटेल्स द्या. मी तुमचे कार्ड लगेच सुरू करून देतो.’ वरुणने त्याच्या कार्डवरील आणि सीव्हीव्ही क्रमांक दिला. अनोळखी व्यक्‍तीने ‘तुमचा मोबाईल सुरूच ठेवा, त्यावर बॅंकेतून एक चार आकडी मेसेज येईल तो मला पाठवून द्या.’ त्यानुसार वरुणने तो चारआकडी क्रमांक पाठविला. असे चार मेसेज आले. ते त्या व्यक्‍तीला पाठविले. त्यानंतर वरुणच्या बॅंक खात्यातून चार वेगवेगळ्या ठिकाणी रक्‍कम हस्तांतरित झाली. वरुणला बॅंक खात्यातून ५० हजार रुपये गेल्याचा मेसेज आला. वरुणने पुन्हा त्या व्यक्‍तीला फोन केल्यानंतर त्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यावर वरुणला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले...

सायबर गुन्ह्याची पद्धत
गुन्हेगार हा आपल्याला फोन करून आपले डेबिट अथवा क्रेडिट कार्ड बंद होणार आहे. आपले आधार कार्ड लिंक नाही, किंवा अशा स्वरूपाचे एखादे कारण सांगून आपल्याला घाबरवून सोडतो. अत्यंत व्यावसायिक पद्धतीने ते आपल्याशी बोलत असतात. त्यामुळे सामान्य नागरिकांचा त्याच्या बोलण्यावर लगेच विश्‍वास बसतो. कार्डवरील क्रमांक आणि वन टाइम पासवर्ड (ओटीपी) देखील शेअर करतो. आपल्याला बोलण्यात गुंतवून ठेवत आपण माहिती देताना ते ऑनलाइन व्यवहार करत असतात. आपण ओटीपी क्रमांक शेअर केला की फोन खाली ठेवेपर्यंत आपल्या कार्डवरून ते ऑनलाइन व्यवहार पूर्ण करून फसवणूक करतात.

गुन्हा घडल्यावर काय कराल...
डेबिट कार्डबाबत गुन्हा झाल्यास संबंधित बॅंकेत कळवून तत्काळ कार्ड ब्लॉक करावे. बॅंकेत समक्ष जाऊन अथवा फोन करून रक्‍कम कोठे गेली, याबाबत ट्रान्झॅक्‍शन आयडीसह माहिती घेऊन सायबर सेलशी संपर्क साधावा.

स्वत: कार्डबाबत माहिती कोणाला शेअर न करता पैसे गेल्यास त्याची जबाबदारी बॅंकेची असते. त्यामुळे बॅंकेत जाऊन ‘डिस्पूट फॉर्म’ भरून द्यावा. बॅंक त्याची चौकशी करून काही दिवसांत आपल्या खात्यात ती रक्‍कम जमा करते. मात्र आपण स्वत: कार्डबाबत माहिती कोणाला दिल्यानंतर फसवणूक झाल्यास त्याची जबाबदारी बॅंकेवर राहत नाही.

बॅंक खात्याचे स्टेटमेंट वेळोवेळी प्राप्त करून आक्षेपार्ह व्यवहार झाल्यास बॅंक आणि सायबर सेलशी संपर्क साधावा.

नागरिकांनी काय करावे
कोणत्याही बॅंकेचे अधिकारी ग्राहकांना फोन करून डेबिट अथवा क्रेडिट कार्डची माहिती विचारत नाहीत. त्यामुळे कोणालाही आपल्या कार्डवरील क्रमांक, सीव्हीव्ही क्रमांक आणि वैधता तारीख सांगू नये.
डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा पिन क्रमांक आपल्या लक्षात ठेवा. अन्य कोणालाही सांगू नका.
एटीएम मशिनचा वापर करताना आपल्या बाजूला कोणी नाही, याची खातरजमा करा.
एटीएम मशिनवर पासवर्ड टाकताना तो कोणी पाहणार नाही, याबाबत खबरदारी घ्या.
ऑनलाइन बॅंकिंग व्यवहार करताना विश्‍वासपात्र आणि सुरक्षित संकेतस्थळावरच एटीएमची माहिती द्यावी.
आपल्या बॅंक खात्याचे स्टेटमेंट प्राप्त करून काही आक्षेपार्ह व्यवहार झाले नाहीत ना, याची खात्री करावी.
बॅंक खात्यातून पैसे गेल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर सेलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. जेणेकरून गुन्हेगाराकडून ऑनलाइन व्यवहार होण्यापूर्वी पैसे हस्तांतरित होण्याचे थांबवून नुकसान टाळता येणे शक्‍य आहे.

Web Title: pune news Debit card crime