कर्जमाफीची मागणी चुकीची नाही - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

पुणे - ‘‘ज्यांच्या हातात दिल्लीची सत्ता आहे, त्यांनी एका राज्यात कर्जमाफी दिली. त्यामुळे अन्य राज्यांतील लोकांची कर्जमाफीची मागणी होणे, हे काही चुकीचे नाही. ही मागणी मान्य होत नसल्याने लोक अस्वस्थ झालेले आहेत,’’ अशा शब्दांत शेतकऱ्यांची बाजू घेतानाच केंद्र आणि राज्यातील सरकारवर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार गुरुवारी टीका केली.

पुणे - ‘‘ज्यांच्या हातात दिल्लीची सत्ता आहे, त्यांनी एका राज्यात कर्जमाफी दिली. त्यामुळे अन्य राज्यांतील लोकांची कर्जमाफीची मागणी होणे, हे काही चुकीचे नाही. ही मागणी मान्य होत नसल्याने लोक अस्वस्थ झालेले आहेत,’’ अशा शब्दांत शेतकऱ्यांची बाजू घेतानाच केंद्र आणि राज्यातील सरकारवर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार गुरुवारी टीका केली.

संसदीय कारकिर्दीस पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पवार यांचा माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पंतप्रधान शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची भूमिका घेतात, निवडून आल्यानंतर तेथील मुख्यमंत्री दोन आठवड्यांत कर्जमाफीची घोषणा करतात, हा निर्णय देशातील सर्व राज्यांमध्ये झाला पाहिजे, ही अपेक्षा होती. बरेच दिवस उलटल्यानंतरही कर्जमाफीचा निर्णय होत नसल्याने लोकशाहीच्या मार्गाने आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर आले आहेत, असे पवार म्हणाले.

शेतकऱ्यांनी पुकारलेला संप हा त्यांच्या भावना किती तीव्र आहेत, याचे लक्षण आहे. तसेच शेतमाल पिकवणारसुद्धा नाही, ही शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी शांतता आणि संयमाच्या मार्गाने आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर येण्याची पूर्वकल्पनाही त्यांनी दिली होती. त्यावर केंद्र आणि राज्याकडून तातडीने निर्णय घेतला जातील, अशी अपेक्षा होती. हा निर्णय घेतला न गेल्याने उद्रेक पाहावयास मिळत आहे. याबाबत शेतकऱ्यांना किंवा या चळवळीत काम करणाऱ्यांना दोष देता कामा नये. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांकडे ही जबाबदारी जात असल्याची टीका पवार यांनी केली. हे पक्षातीत आंदोलन होत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. आमच्या लोकांनी या आंदोलनाला सहकार्य करावे, अशा सूचना दिल्या आहेत; परंतु आम्ही पक्ष म्हणून हे आंदोलन करत नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

शेतमालाला हवी चांगली किंमत
उत्तर प्रदेशने कर्जमाफीचा निर्णय घेतला. ते सूत्र नजरेसमोरून ठेवून बाकीच्या राज्यांमध्ये कर्जमाफी दिली पाहिजे. त्याशिवाय हे थांबणार नाही. शेतमालाला उत्तम किंमत मिळाली तर कर्जमाफीची मागणी राहणार नाही. मी कृषिमंत्री होतो, तेव्हा ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले. शेतमालाच्या किमती वाढवून दिल्या. परिणामी देशातील उत्पन्न वाढले. भारत हा जगातील महत्त्वाचा निर्यातदार देश झाला. गहू, तांदूळ, कापूस आणि साखर या चारही शेतमालांमध्ये भारत हा क्रमांक एक आणि दोनचा निर्यातदार ठरला. शेतमालाला हल्ली चांगली किंमत द्यायची नीती थंडावली आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Web Title: pune news The debt waiver demand is not wrong