परवानगी नसल्याने ‘डेमू’चा ‘ठिय्या’!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पुणे - गेल्या दोन महिन्यांत रेल्वेच्या पुणे विभागात प्रत्येकी दहा डबे असलेल्या चार ‘डेमू’ गाड्या नव्याने दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांची संख्या आता सातवर गेली आहे. मात्र, रेल्वे बोर्डाची परवानगी नसल्याने त्यापैकी चार गाड्या स्थानकातच उभ्या आहेत. परिणामी, गरज असूनदेखील प्रवाशांना या गाड्याची सेवा मिळत नाही व रेल्वेचा महसूलही बुडत आहे.

गेल्या वर्षी पुणे-दौंड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. मात्र, काही तांत्रिक कामे अद्याप बाकी असताना या मार्गावर डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.

पुणे - गेल्या दोन महिन्यांत रेल्वेच्या पुणे विभागात प्रत्येकी दहा डबे असलेल्या चार ‘डेमू’ गाड्या नव्याने दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांची संख्या आता सातवर गेली आहे. मात्र, रेल्वे बोर्डाची परवानगी नसल्याने त्यापैकी चार गाड्या स्थानकातच उभ्या आहेत. परिणामी, गरज असूनदेखील प्रवाशांना या गाड्याची सेवा मिळत नाही व रेल्वेचा महसूलही बुडत आहे.

गेल्या वर्षी पुणे-दौंड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. मात्र, काही तांत्रिक कामे अद्याप बाकी असताना या मार्गावर डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.

त्यानुसार जानेवारी महिन्यात दोन डेमू गाड्या पुणे स्टेशन येथे दाखल झाल्या. त्यानंतर काही दिवसात आणखी एक गाडी दाखल झाली. मात्र, या मार्गावरील प्रवाशांची संख्या विचारात घेऊन प्रशासनाने एका गाडीचे डबे दोन डेमू गाड्यांना विभागून लावले. त्यामुळे या मार्गावर प्रत्येकी पंधरा डब्यांच्या दोन ‘डेमू’ सोडण्यात आल्या. मात्र, ज्या दिवसांपासून या गाड्या सोडण्यात आल्या; तेव्हापासून त्यांना काहींना काही तांत्रिक बिघाड होत राहिला. यामुळे अखेर या गाड्या बंद करून पुन्हा पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र, दुपारच्या वेळेत या गाड्या दौंड मार्गावर सोडण्यात येत आहेत. सध्या या मार्गावरील दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे त्या गाड्याही बंद आहेत.

‘डेमू’ गाड्याची अशी स्थिती असताना गेल्या महिन्यात चार ऑगस्ट रोजी आणखी दोन नवीन गाड्या दाखल झाल्या. त्यानंतर आठवडाभरात आणखी एक ‘डेमू’ दाखल झाली. या तिन्ही गाड्या खडकी रेल्वे स्थानकात उभ्या आहेत. असे असतानाच आणखी एक डेमू गाडी नुकतीच नव्याने दाखल झाली. ती गाडी हडपसर येथील स्थानकात उभी करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने दाखल झालेल्या चार डेमू गाड्या रेल्वे स्थानकामध्ये उभ्या आहेत. त्यामुळे या गाड्या प्रवाशांना सेवाही देऊ शकत नाहीत व ‘रेल्वे’ला महसूलही मिळून देऊ शकत नाहीत. या उलट त्यांच्या देखभालीसाठी रेल्वे पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून रेल्वे प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार समोर आल्याची टीका होत आहे. 

रेल्वेचा कारभार नियोजनशून्य
रेल्वे प्रशासनाने मागणी केल्यामुळे या ‘डेमू’ पुणे विभागाला मिळाल्या आहेत. मग त्या चार मार्गांवर का सुरू करण्यात आल्या नाहीत. त्या उभ्या राहिल्याने ‘रेल्वे’चे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्याला जबाबदार कोण? तसेच त्या सुरू करण्यासाठी बोर्डाच्या परवानगीची काय गरज आहे. दोन दिवसांपूर्वी रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक डी. के. शर्मा पुण्यात आले होते. तेव्हा या गाड्या सुरू करण्यासाठी त्यांची परवानगी का घेतली नाही. यावरून रेल्वे प्रशासनाचा कारभार नियोजनशून्य असल्याचे रेल्वे प्रवासी ग्रुपचे हर्षा शहा यांनी सांगितले.

या मार्गांवरही ‘डेमू’ची गरज 
पुणे-कोल्हापूर-पुणे, पुणे-सातारा-पुणे, पुणे-लोणंद, फलटण आणि पुणे-दौंड-कुर्डुवाडी-बार्शी, या चार मार्गांवर डेमू गाड्या सुरू केल्यास लाखो प्रवाशांची सोय होईल. याबाबतचा प्रस्तावदेखील तयार करण्यात आला आहे. मात्र, रेल्वे प्रशासन या मार्गावर या गाड्या का सुरू करीत नाहीत, हे कोडे अद्याप उलगडलेले नाही. चारही मार्गावरील विद्युतीकरणाचे काम अर्धवट आहे. या मार्गावर या गाड्या धावणे शक्‍य आहे. तसे झाल्यास रेल्वेच्या महसुलातही वाढ होईल व प्रवाशांचीदेखील सोय होईल.
 

गाडी बंद पडल्याने हाल
लोणी काळभोर ः येथील रेल्वे स्टेशनवर सुमारे दोन तास बंद पडलेल्या ‘डेमू’मुळे सोमवारी (ता. २५) सकाळी रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यामुळे नोकरदार व इतर प्रवाशांनी रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त केला. 

याबाबत रेल्वे प्रवासी गोपाल शर्मा व दादा काळे यांनी सांगितले, ‘‘पुणे स्टेशन येथून दौंडकडे जाण्यासाठी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी निघालेली ‘डेमू’ गाडी १० वाजून १५ मिनिटांनी लोणी स्टेशन येथे दाखल झाली. मात्र, गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी सुरू होण्यास दोन तासांचा कालावधी गेला. ‘डेमू’ अचानक बंद पडल्याने पुण्याहून येणाऱ्या ‘उद्यान एक्‍स्प्रेस’ला थांबविण्याची विनंती आम्ही स्थानक व्यवस्थापकांकडे केली होती. मात्र, अचानकपणे एक्‍स्प्रेस गाडी थांबविणे शक्‍य नसल्याचे स्थानक व्यवस्थापकांनी सांगितले. तसेच, इंजिन दुरुस्ती पथकाला कळविले असून, तातडीने दुरुस्ती झाल्यास गाडी पुढे पाठवण्यात येईल, असे स्पष्ट केले.’’ दरम्यान, पुणे ते दौंड दरम्यान रेल्वे प्रवाशांचा प्रतीक्षेत असलेल्या डेमू लोकल सेवा २५ मार्च २०१७ पासून सुरू झाली. मात्र, आजतागायत ‘डेमू’मध्ये होणारे तांत्रिक बिघाड, इतर रेल्वे गाड्यांच्या वेळेनुसार बदलणारे ‘डेमू’चे वेळापत्रक यामुळे प्रवासी संतापले आहेत. 

Web Title: pune news demu stop by no permission