डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पुणे - डेंगीच्या तापाने पुणेकर फणफणल्याचे चित्र सध्या शहरातील बहुतांश रुग्णालयांमधून दिसत आहे. काही रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या 22 दिवसांमध्ये शहरात 161 रुग्णांना डेंगीच्या संसर्गाचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शुक्रवारी देण्यात आली. 

पुणे - डेंगीच्या तापाने पुणेकर फणफणल्याचे चित्र सध्या शहरातील बहुतांश रुग्णालयांमधून दिसत आहे. काही रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या 22 दिवसांमध्ये शहरात 161 रुग्णांना डेंगीच्या संसर्गाचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शुक्रवारी देण्यात आली. 

शहरातील डेंगीचा ताप वेगाने वाढत आहे. एकेका दिवसात 24 ते 30 डेंगीचे रुग्ण आढळत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. गेल्या नऊ महिन्यांमध्ये डेंगीचे निश्‍चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या 481 असली तरीही संशयित रुग्णांची संख्या दोन हजाराच्या जवळ पोचली आहे. त्यापैकी दीड हजार रुग्ण हे गेल्या दोन महिन्यांमधील असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

का वाढतोय डेंगी? 
शहरात गेल्या महिन्यात पडलेल्या दमदार पावसाचे पाणी सोसायट्यांच्या परिसरात, मोकळ्या मैदानात पडलेल्या नारळ करवंट्यांमध्ये साचले. त्या साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंगीच्या विषाणूंचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती होत आहे. हे डास चावल्याने शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत  आहे. शहराच्या सर्व भागात डेंगीचा हा ताप वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नोंदविण्यात आले आहे. 

सोसायट्यांबरोबरच घरातही फुलदाणी, फ्रिजच्या मागील ट्रे, कुंड्या यातून चाललेल्या पाण्यात डेंगीच्या आळ्या सापडल्या आहेत. रुग्णालये, सरकारी कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेंगीचे डास आढळले आहेत. या सर्वांना नोटीस बजावण्यात येत आहेत. शहरात आतापर्यंत साडेचार हजार नोटीस बजावण्यात आल्या आहेत, अशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

महापालिकेने डेंगी नियंत्रणासाठी ठोस पावले टाकली आहेत. मात्र, सातत्याने पडणारा पाऊस आणि बदलते वातावरण यामुळे मर्यादा पडत आहे. पावसाने विश्रांती दिल्याने ठिकठिकाणी धूर फवारणी सुरू आहे. त्यामुळे लवकरच डासांची पैदास नियंत्रणात येईल. 
डॉ. कल्पना बळीवंत, कीटकरोग विभाग प्रमुख, पुणे महापालिका 

डेंगी कशामुळे होतो? 
डेंगी हा एक विषाणूजन्य रोग आहे. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे तो प्रसारित केला जातो. एडीस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे 5 मिलिमीटर असतो. डेंगी हा फ्लूसारखा आजार आहे. 

डेंगी तापाची लक्षणे 
- एकदम जोराचा ताप चढणे 
- डोक्‍याचा पुढचा भाग अतिशय दुखणे 
- डोळ्यांच्या मागील भागात वेदना, जी डोळ्यांच्या-हालचालीसोबत अधिक होते 
- स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना 
- चव आणि भूक नष्ट होणे 
- छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे 
- मळमळणे आणि उलट्या 

डास होऊ नयेत यासाठी 
घ्यावयाची काळजी 
- घरात किंवा घराच्या बाहेर उघड्यावर पाण्याचा साठा फार दिवस ठेऊ नये. 
- ज्या भाड्यांमध्ये पाणी साठवत असू, ती भांडी वेळोवेळी स्वच्छ करावीत. 
- घरात डास येऊ नयेत यासाठी सायंकाळच्या वेळी थोडा वेळ घराच्या खिडक्‍या व दारे बंद ठेवावीत. 
- खिडक्‍यांना जाळ्या बसवून घ्याव्यात. 
- इमारतीवरील पाण्याच्या टाक्‍याही वेळोवेळी स्वच्छ कराव्यात. त्या झाकलेल्या असतील याची काळजी घ्यावी. 

डेंगीचे निदान झाल्यास घ्यावयाची काळजी 
- ताप असेपर्यंत आराम करावा. 
- तापासाठी किंवा वेदनाशामक कोणत्याही गोळ्या डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. 
- निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. 
- रक्तस्राव किंवा शोकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे.

Web Title: pune news dengue health