अधिकारी नसल्याने "डेंगी' येईना नियंत्रणात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

पुणे - डासांचा बंदोबस्त करणारी औषधे उपलब्ध आहेत, ती फवारणारे, त्याचा प्रभावी वापर करणारे मनुष्यबळ आहे. मात्र, त्यावर देखरेख करणाऱ्या, त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सुपरवायझर दर्जाचा अधिकारी नाही. त्यामुळे डेंगीचा उद्रेक नियंत्रणात येत नसल्याची चर्चा आता महापालिकेत रंगली आहे. 

पुणे - डासांचा बंदोबस्त करणारी औषधे उपलब्ध आहेत, ती फवारणारे, त्याचा प्रभावी वापर करणारे मनुष्यबळ आहे. मात्र, त्यावर देखरेख करणाऱ्या, त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सुपरवायझर दर्जाचा अधिकारी नाही. त्यामुळे डेंगीचा उद्रेक नियंत्रणात येत नसल्याची चर्चा आता महापालिकेत रंगली आहे. 

शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी औषधांचा मुबलक साठा पालिकेकडे आहे. ती औषधे फवारण्यासाठी आवश्‍यक उपकरणे आणि मनुष्यबळही पालिकेने घेतले आहे. मात्र, या मनुष्यबळाचे कुशलतेने वापर करणारी पदे रिक्त आहेत, त्यामुळे औषध फवारणी योग्य पद्धतीने आणि आवश्‍यक तेथे होत आहे का, त्याचा प्रभावी वापर करण्यात येत आहे का, अशा प्रकारची देखरेख होताना दिसत नाही. त्याचा थेट परिणाम डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढण्यात झाला आहे, अशी चर्चा आरोग्य खात्यात सुरू आहे. 

शहरात गेल्या तीन वर्षांत यंदा डेंगीचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांनी आरोग्य खात्याच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या पार्श्‍वभूमीवर आता सुपरवायझर दर्जाचा अधिकारी नसल्याने डेंगीचा उद्रेक नियंत्रणात येत नसल्याची सारवासारव खात्यातर्फे केली जात असल्याचे काही कर्मचाऱ्यांचे मत आहे. 

डेंगीचा उद्रेक नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक डॉक्‍टर असणे आवश्‍यक आहे. मात्र, पालिकेने सध्या चार ते पाच क्षेत्रीय कार्यालये मिळून एक डॉक्‍टर नियुक्त केला आहे. त्यामुळे कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख राहत नाही, तेथील कामात अपेक्षित गुणवत्ता राहत नाही. त्यामुळे औषध फवारणी करूनही डेंगी नियंत्रणात येत नसल्याचे चित्र शहरात दिसत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

महिना डेंगीचे संशयित रुग्ण 
जानेवारी 19 
फेब्रुवारी 16 
मार्च 28 
एप्रिल 23 
मे 28 
जून 58 
जुलै 228 
ऑगस्ट 786 
सप्टेंबर 1114 
ऑक्‍टोबर 1819 
नोव्हेंबरपर्यंत 452 
---------------------------- 
एकूण 4571 

Web Title: pune news dengue health