डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

पुणे - पाऊस सुरू झाल्यापासून शहरात डेंगीची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. महापालिकेच्या दफ्तरातही डेंगीसदृश रुग्णांची नोंद मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती पुढे आली आहे. 

पुणे - पाऊस सुरू झाल्यापासून शहरात डेंगीची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. महापालिकेच्या दफ्तरातही डेंगीसदृश रुग्णांची नोंद मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती पुढे आली आहे. 

शहर आणि परिसरात गेल्या महिन्यात पाऊस सुरू झाला. नैॡत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) सुरू झाल्यापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात पाण्याची डबकी साचली आहेत. तसेच सोसायट्या आणि कार्यालयांच्या परिसरातील मोकळ्या जागेत पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, नारळाची करवंटी यात साठलेल्या पावसाच्या पाण्यात डासांची पैदास होऊ लागली आहे. त्यामुळे डेंगी, हिवताप आणि चिकुनगुनिया अशा कीटकजन्य आजारांचा प्रसार होण्याचा धोका असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. 

डॉ. अतुल बोडके म्हणाले, ‘‘शहरात पहिला पाऊस झाल्यानंतर ताप, थंडी, खोकला होत असल्याच्या तक्रारी घेऊन दवाखान्यात रुग्ण येत आहेत. त्यांना सुरवातीला गोळ्या-औषध देऊन परत दोन ते तीन दिवसांनी येण्याचा सल्ला दिला जात आहे. त्या औषधांनी बरे वाटल्यास त्याच गोळ्या पुढील काही दिवस सुरू ठेवण्यास सांगितले जाते; पण काही फरक पडलेला नसेल, तर रक्ततपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. त्यातून काहींना डेंगी झाल्याचे निदान होते. ’’

शहराच्या वेगवेगळ्या भागात डेंगीची लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत डेंगीसदृश लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या १७३ आहे. त्यापैकी ५८ रुग्ण फक्त जूनमधील आहेत. हिवतापाच्या रुग्णांचे प्रमाण कमी असले तरीही चिकुनगुनियाचे रुग्ण अधिक असल्याचेही खात्याने स्पष्ट केले.

डेंगीसदृश रुग्णांची वाढती संख्या
महिना    रुग्णांची संख्या 

जानेवारी    १९
फेब्रुवारी    १६
मार्च    २८
एप्रिल    २३
मे     २८
जून    ५८
(स्रोत - आरोग्य विभाग, पुणे महापालिका)

Web Title: pune news dengue patient increase