डेंगी पुन्हा फोफावणार!

डेंगी पुन्हा फोफावणार!

पुणे - पावसामुळे शहरातील डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या आणखी वेगाने वाढेल, असा इशारा कीटकशास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे आतापर्यंत घरांमधील डासांची शोधशोहीम राबविणाऱ्या महापालिकेला पुन्हा सार्वजनिक ठिकाणच्या डासोत्पत्तीच्या ठिकाणांवर लक्ष द्यावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डासांपासून संसर्ग होणाऱ्या डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या ऑगस्टपासून वेगाने वाढत आहे. एका आठवड्यात डेंगीचे ८४ रुग्ण सापडत आहेत. डेंगीचा संशय असलेल्या रुग्णांची संख्या तर अडीचशे ते तीनशेपर्यंत पोचली आहे. ऑक्‍टोबरमध्ये मॉन्सून महाराष्ट्रातून परत फिरला. त्यामुळे नोव्हेंबरच्या सुरवातीपासून पाऊस थांबला होता. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाणी साचून होणारी डासोत्पत्ती आटोक्‍यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. महापालिकेनेही घरांमध्ये आढळणाऱ्या डासोत्पत्तीवर लक्ष केंद्रित केले होते. मात्र गेल्या आठवड्यात शहराच्या वेगवेगळ्या भागात पडलेल्या पावसाच्या सरींमुळे डेंगी आणि चिकुनगियिा हे कीटकजन्य आजार पुन्हा डोके वर काढणार असल्याचा इशारा सार्वजनिक आरोग्य खात्यातील कीटकतज्ज्ञांनी दिला आहे. 

पावसामुळे पुढील आठ दिवसांमध्ये शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढेल, असे मत नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत कीटकतज्ज्ञांनी व्यक्त केले. पाऊस थांबल्याने टायर, नारळाची करवंटी, भंगार साहित्य कोरडे झाले होते. येथे होणारी डासांची पैदास थांबली होती. त्यामुळे नोव्हेंबरपासून डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती; पण गेल्या आठवड्यातील पावसाने डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यातून डेंगीचा उद्रेक वाढेल, असे कीटकरोग तज्ज्ञांनी सांगितले. 

महापालिकेच्या कीटकजन्य रोग विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत म्हणाल्या, ‘‘पावसामुळे सार्वजनिक ठिकाणी डासप्रतिबंधक उपाययोजना पुन्हा सुरू केल्या आहेत. 

औषध फवारणी परिणामकारकपणे करण्यात येत आहे. तसेच घराघरांमध्ये जाऊन डासांच्या उत्पत्तिस्थळांचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. विशेषतः झोपडपट्ट्यांमधील डासोत्पत्तीस्थळे नष्ट करण्यावर भर देण्यात आला आहे.’’

शहरात पाच रुग्णांचा मृत्यू
जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान राज्यात सर्वाधिक डेंगीचे रुग्ण पुण्यात आढळले आहेत. पुण्यातील निदान झालेल्या एक हजार ४०० पैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्या खालोखाल मुंबईमध्ये एक हजार ११ रुग्ण आढळले असून, तेथे डेंगीने १७ रुग्ण मृत्युमुखी पडल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

असा वाढला डेंगी आणि चिकुनगुनिया
महिना     डेंगीचे रुग्ण     चिकुनगुनियाचे रुग्ण

जानेवारी     ८     ३६
फेब्रुवारी     २     १७
मार्च     ४     १७
एप्रिल     ५     ११
मे    ४     ४
जून    ६     ७
जुलै     ५८     २८
ऑगस्ट    २३४     १२८
सप्टेंबर    २५१     १४० 
ऑक्‍टोबर     ५२६     २६२
२५ नोव्हेंबर     ४००     १९७
(स्रोत - आरोग्य विभाग, पुणे महापालिका)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com