येथे क्षण माझे फुलले; पुण्याने दिला प्रगतीसाठी हात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

पुणे - ‘पुण्यात राहिल्यानेच माझी प्रगती झाली, पुण्यावर माझे प्रेम आहे, हे शहर चांगल्या दर्जाचे आहे’, अशी पुण्याविषयीची आत्मीयता व्यक्त करत असतानाच ‘माझं पुणं दिवसेंदिवस बकाल होत आहे’, अशी खंत पुणेकर व्यक्त करत आहेत. पुण्यापुढील सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न वाहतूक हाच असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे. 

पुणे - ‘पुण्यात राहिल्यानेच माझी प्रगती झाली, पुण्यावर माझे प्रेम आहे, हे शहर चांगल्या दर्जाचे आहे’, अशी पुण्याविषयीची आत्मीयता व्यक्त करत असतानाच ‘माझं पुणं दिवसेंदिवस बकाल होत आहे’, अशी खंत पुणेकर व्यक्त करत आहेत. पुण्यापुढील सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न वाहतूक हाच असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे. 

‘आपल्या शहराविषयी पुणेकरांना काय वाटते’, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न ‘ई-सकाळ’च्या माध्यमातून एका ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे करण्यात आला. या सर्वेक्षणास पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आपले स्पष्ट अभिप्राय नोंदवले. ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न पाहणारे पुणे कोणत्या दर्जाचे शहर आहे, या प्रश्‍नावर सर्वेक्षणात मत नोंदविणाऱ्यांपैकी ६८ टक्के पुणेकरांनी ‘चांगल्या दर्जाचे शहर’ अशी पावती दिली आहे. २९.९ टक्के नागरिकांना हे शहर मध्यम दर्जाचे वाटते, तर ३.१ टक्के जणांनी हे शहर वाईट असल्याचे म्हटले आहे. पुण्यात राहिल्याने माझी वैयक्तिक प्रगती झाल्याचे ८४ टक्के पुणेकरांना वाटते. १३.९ टक्के जणांना आपल्या प्रगतीत पुण्याचे योगदान काही अंशीच असल्याचे वाटते, तर दोन टक्के नागरिकांचे मत नकारात्मक आहे. 

पुणेकर आणि आनंद हे जणू समीकरण मानले जाते. याबाबत पुण्यात राहून आपण आनंदी असल्याचे मत ८० टक्के पुणेकरांनी नोंदविले आहे; पण १५ टक्के पुणेकरांनी मात्र आपल्याला शहर सोडावेसे वाटते, असे स्पष्टपणे म्हटले आहे, तर पाच टक्के पुणेकरांना या शहरात आपण आनंदी नसल्याचे वाटते. माझ्या पुढच्या पिढ्यांनीही पुण्यातच राहावे असे वाटते काय?

याबाबतही बहुसंख्य पुणेकरांचे एकमत आहे. ७९ टक्के जणांना आपली पुढची पिढी पुण्यातच मोठी व्हावी, असे वाटते, तर ११.९ टक्के जणांना आपल्या पुढच्या पिढीने पुण्याबाहेर जावे असे वाटते. ९ टक्के जणांनी पुण्यात नकोच, असे म्हटले आहे. पुण्याची ओळख सांस्कृतिकनगरी अशी आहे. तुम्ही पुण्याला भारताचे डेट्रॉइट, आयटी हब, सांस्कृतिक राजधानी की ‘ऑक्‍सफर्ड ऑफ ईस्ट’ यापैकी कोणती एक उपमा द्याल? या प्रश्‍नावर ७५ टक्के जणांनी पुण्याला ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणणेच पसंत केले आहे. १५ टक्के जणांनी पुण्याला ‘आयटी हब’ ही उपमा दिली आहे. 

पुण्यात सध्या वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर आहे. हाच प्रश्‍न सर्वेक्षणातही अधोरेखित झाला आहे. ८५ टक्के नागरिकांनी वाहतूक हाच पुण्यातील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्‍न असल्याचा कौल दिला आहे. कचरा हा दुसऱ्या क्रमांकाचा, प्रदूषण हा तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्‍न वाटतो. परवडणारी घरे आणि मैदाने हा प्रश्‍नही काही पुणेकरांना महत्त्वाचा वाटतो. पुण्याविषयी प्रेम असणारे बहुसंख्य नागरिक असले तरीही शहर बकाल होत असल्याबद्दलही त्यांनी सर्वेक्षणात चिंता व्यक्त केली आहे. ५७.८ टक्के नागरिकांना पुणे बकाल होत आहे, असे वाटते, तर ४२ टक्के नागरिकांना मात्र हे मान्य  नाही.

सर्वेक्षणातील महत्त्वाच्या बाबी 
पुणे चांगल्या दर्जाचे शहर
पुण्यात राहिल्याने झाली वैयक्तिक प्रगती
वाहतूक हाच पुण्याचा कळीचा प्रश्‍न 
पुणे सांस्कृतिक राजधानीच
बहुसंख्य जण पुण्यात राहून आनंदी 
पुणे बकाल होत असल्याबद्दलही चिंता

पुणं कसं आहे?
चांगले 68%
मध्यम  29%
वाईट 3%

Web Title: pune news development in pune