शहांच्या खुनात आणखी काहींच्या सहभागाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पुणे - रिअल इस्टेट व्यावसायिक देवेन शहा यांच्या खूनप्रकरणी डेक्‍कन पोलिसांनी एकाला अटक केली असून, दुसऱ्या हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे. या खुनात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्‍यता असून, त्याबाबत तपास सुरू आहे, अशी माहिती परिमंडल एकचे पोलिस उपायुक्‍त डॉ. बसवराज तेली यांनी दिली. 

पुणे - रिअल इस्टेट व्यावसायिक देवेन शहा यांच्या खूनप्रकरणी डेक्‍कन पोलिसांनी एकाला अटक केली असून, दुसऱ्या हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे. या खुनात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्‍यता असून, त्याबाबत तपास सुरू आहे, अशी माहिती परिमंडल एकचे पोलिस उपायुक्‍त डॉ. बसवराज तेली यांनी दिली. 

रवी सदाशिव चोरगे (वय 41, रा. अमृतनगर, माणिकबाग, सिंहगड रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे, तर राहुल चंद्रकांत शिवतारे (वय 41, रा. वडगाव बुद्रुक) हा फरारी आहे. या दोघांनी शहा यांच्यावर गोळ्या झाडून खून केल्याची कबुली चोरगे याने दिली आहे. शहा हे डेक्‍कन परिसरातील प्रभात रस्त्यावरील सायली अपार्टमेंटमध्ये राहत होते. 13 जानेवारी रोजी रात्री दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांचा खून केला होता. 

डॉ. तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटविण्यात आली. डेक्‍कनचे वरिष्ठ निरीक्षक अजय कदम यांना खबऱ्याकडून चोरगे हा जळगावमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला, सहआयुक्‍त रवींद्र कदम, अतिरिक्‍त आयुक्‍त रवींद्र सेनगावकर, पोलिस उपायुक्‍त डॉ. तेली आणि सहायक आयुक्‍त बाजीराव मोहिते यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक अजय कदम यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलिस हवालदार सतीश सोनवणे, पांडुरंग जगताप आणि धोंडुपंत पांचाळ यांनी चोरगे याला के. पी. हॉटेलमधून रविवारी अटक केली. 

चोरगे हा रिअल इस्टेट व्यावसायिकांना जमिनी दाखवून खरेदी-विक्रीचे व्यवहार करत होता. त्याचा साथीदार शिवतारे हा फरारी असून, या गुन्ह्यात आणखी काही जणांच्या सहभागाची शक्‍यता आहे. जमीन व्यवहारातील कमिशनच्या वादातूनच हा खून झाला का? हे तपासात समोर येईल. 

दरम्यान, शहा पुण्यात येण्यापूर्वी मुंबईत व्यवसाय करत होते. त्या वेळी काही गुन्हा घडला होता? तसेच शहा यांच्या खुनाशी अंडरवर्ल्ड टोळीचा संबंध आहे का? हे ही तपासण्यात येत असल्याचे तेली यांनी स्पष्ट केले. 

पुण्यापासून इंदूर व्हाया जळगाव 
चोरगे याने मित्राची दुचाकी आणली होती. खून केल्यानंतर दोघे त्या दुचाकीवर भोर येथे गेले. तेथून महाड, कोकणातून खोपोली, देहू रस्ता, पुन्हा खोपोली, अक्‍कलकोट, ठाणे तेथून मध्य प्रदेशातील इंदूर, उज्जैन, बुऱ्हाणपूर येथे गेले. त्या दोघांनी दुचाकी, एसटी बस आणि लक्‍झरी बसने प्रवास केला. गुरुवारपर्यंत ते दोघे एकत्रित होते; परंतु पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी ते वेगळे झाले. चोरगे हा तेथून जळगावला गेला. त्यानी दुचाकी अर्ध्या रस्त्यात सोडून दिली. शिवतारे याने चोरगेला जळगावला जाताना काही पैसे दिले होते; मात्र चोरगे याच्याकडे केवळ 50 ते 60 रुपये शिल्लक होते. 

ओळख लपविण्यासाठी काढली मिशी 
चोरगे हा पूर्वी नवी पेठेत राहत होता. त्याला नुकताच एक मुलगा झाला आहे. शहा यांचा खून केल्यानंतर त्याने स्वत:ची ओळख लपविण्यासाठी मिशी काढली होती. शहा यांच्यासोबत आरोपींनी काही व्यवहारही केले होते; परंतु शहा यांचा मुलगा अतित याने आरोपींना कसे ओळखले नाही, त्यावर पोलिस उपायुक्‍त तेली यांनी ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही, असे सांगितले. 

शिवतारे याने झाडली पहिली गोळी 
राहुल शिवतारे याने शहा यांच्यावर पहिली गोळी झाडली. त्यानंतर चोरगे यानेही शहा यांच्यावर गोळ्या झाडल्या. दोघांकडे पिस्तूल होते; मात्र चोरगे याच्याकडील पिस्तूल मिळालेले नाही. त्याने पिस्तूल कोठे लपविले, तसेच या गुन्ह्यात आणखी कोण सहभागी आहे का? याबाबत तपास सुरू आहे. चोरगे याच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल नाही; मात्र शिवतारे याच्यावर अपघात आणि मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: pune news deven shah murder case crime