जमिनीच्या व्यवहारातून देवेनभाई शहांची हत्या झाल्याचा संशय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

पुणे - बांधकाम व्यावसायिक देवेनभाई शहा यांची जमिनीच्या व्यवहारातून हत्या झाल्याची शक्‍यता पुणे पोलिसांनी वर्तवली आहे; परंतु अद्यापही हल्लेखोर पकडले गेले नसल्यामुळे त्यासाठी शहा यांच्या राहत्या घरासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित करून तपासाला सुरवात केली आहे. गुन्हे शाखेसह डेक्कन व अन्य पोलिस ठाण्यांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. वर्णनावरून रेखाचित्रे बनविण्याचे कामदेखील सुरू केले आहे.

डेक्कन जिमखाना परिसरातील प्रभात रस्ता, गल्ली क्रमांक 7 येथील सायली अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात दोन जणांनी केलेल्या गोळीबारात देवेनभाई जयसुखलाल शहा (वय 55) यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला.

मुलगा अतित शहा याच्यासमोरच हा दुर्दैवी प्रकार घडला. जमिनीच्या व्यवहारातून किंवा खंडणीसाठी ही हत्या केल्याची शक्‍यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून दुचाकीवरून पळ काढला. त्यांनी शहा यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या असून, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. छातीत एक तर कमरेत दोन गोळ्या लागल्या. त्यात शहा गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता, रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सर्व सीसीटिव्ही फुटेज घेऊन विशेष पथके नेमून तपासाला सुरवात केली. आरोपींच्या दुचाकीचे फुटेज सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे सूत्रांनी सांगितले. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी चोरीची असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी गुन्ह्याचा तपास करत आहेत. डेक्कनसह खडक, अलंकार, कोथरूड पोलिस ठाण्यातील पोलिसांचे सहकार्य घेतले जात आहे.

या प्रकरणी अतित शहा (29, रा. फ्लॅट नं.4, सायली अपार्टमेंट, प्रभात रोड) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देवेनभाई शहा हे कमला नेहरू उद्यानजवळ "अंबिका ग्रुप ऑफ रिअल इस्टेट' नावाची कंपनी चालवत होते. शहा मूळचे मुंबई येथील असून, गेल्या 14 वर्षांपासून पुण्यात व्यवसाय करत होते. पौड, शिरवळ, धायरी, कोंढवे-धावडे या भागात जमीन खरेदी-विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता.

दरम्यान, शनिवारी रात्री सायली अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये दोन तरुण शिवीगाळ करत असून, ते मोठ्या साहेबांना भेटायला आले आहेत, असे इस्त्री दुकानचालकाने शहा यांना सांगितले. त्यावर देवेन शहा आणि त्यांचा मुलगा अतित दोघे पार्किंगमध्ये आले. "काय काम आहे?' अशी विचारणा करत त्यांना बाकड्यावर बसण्यास सांगितले;' परंतु अज्ञात दोघांनी त्यांच्यावर पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या. त्यापैकी तीन गोळ्या देवेन यांना लागल्या तर अतित यांच्या दिशेने एक गोळी झाडली. अतित यांनी दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, "तुलाही ठार मारू' अशी धमकी त्यांनी दिली. जखमी अवस्थेतील देवेन शहा यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता, रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

वर्णनावरून आरोपींची रेखाचित्रे
पोलिसांनी अतित शहांकडून गुन्हेगाराचे वर्णन घेतले आहे. त्यानुसार एका व्यक्तीने "ग्रे रंगाची पॅंट, निळा शर्ट, पायात स्पोर्ट शूज, अंगाने मजबूत, वय अंदाजे 30 ते 40, उंची पाच फूट सात इंच, तर दुसरा व्यक्ती अंगाने सडपातळ, रंगाने सावळा, उंची अंदाजे 5 फूट 8 इंच, वय अंदाजे 30 ते 40 वर्षे असे नमूद केले आहे. या वर्णनावरून रेखाचित्रे बनविण्याचे कामदेखील सुरू केले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने तपासकार्य सुरू झाले आहे.

बांधकाम व्यावसायिक शहा यांच्या हत्येच्या तपासासाठी सहा विशेष पथके तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने
तपास योग्य दिशेने सुरू आहे. आरोपींना लवकरच पकडले जाईल. त्यांना अटक केल्यानंतरच हत्येमागील नेमके कारण समजू शकेल.''
- बसवराज तेली, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ एक
Web Title: pune news devenbhai shaha murder