मधूमेहींच्याही आयुष्यात येणार गोडवा 

मधूमेहींच्याही आयुष्यात येणार गोडवा 

पुणे - निरोगी आयुष्याची गोडी खऱ्या अर्थाने वाढेल अशी क्रांतिकारी साखर तयार करण्याची किमया विकास दांगट या शेतकरी कुटुंबातील मराठमोळ्या उद्योजकाने घडवली आहे. नेहमीच्या साखरेपेक्षा तब्बल 25 टक्‍क्‍यांनी ग्लायसेमीक इंडेक्‍सचे (जीआय) प्रमाण त्यात कमी आहे. अशा प्रकारची आरोग्यदायी साखर जगात प्रथमच उपलब्ध केल्याचा दावाही दांगट यांनी केला आहे. या साखरेमुळे मधूमेह किंवा तत्सम विकारांना चार हात दूर ठेवणे शक्‍य होणार आहे. पुण्यातील ग्राहकांना या साखरेचा गोडवा चाखणे लगेचच शक्‍य होणार आहे. 

पुण्याहून साताऱ्याकडे महामार्गावर शिरवळनजिक सातारा जिल्ह्याच्या हद्दीत विंग नावाचे गाव लागते. याच गावाच्या शिवारात विकास दांगट या दूरदृष्टीच्या, महत्वांकाक्षी उद्योजकाचा चौदा एकरांत वसलेला वैश्विक फूडस हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा उद्योगप्रकल्प आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्‍यातील उंब्रज येथील शेतकरी कुटूंबातील आणि शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियअर असलेला हा मराठमोळा उद्योजक आहे. आपल्या एसव्ही ग्रूप ऑफ कंपनीज या नावाने विविध क्षेत्रातील तब्बल नऊ कंपन्यांचे समूह संचालक म्हणून दांगट आज यशस्वी जबाबदारी पार पाडत आहेत. जागतिक बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वैश्विक फूडस ब्रॅंडने नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करण्यात दांगट यांचा हातखंडा आहे. या कंपनीने आज अमेरिका व युरोपीय देशांची बाजारपेठ हस्तगत केली असून सुमारे 90 टक्के उत्पादनांची निर्यातही यशस्वी साधली आहे. यात ताजा भाजीपाला, फळे यांच्या व्यतिरिक्त फ्रोजन, पिकल्ड, इन्स्टंट मिक्‍स, रेडी टू कूक, रेडी टू सर्व्ह आदी विविध उत्पादनांचा समावेश आहे. 

वैशिष्ट्यपूर्ण साखरेची निर्मिती 

वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची यशस्वी परंपरा कायम ठेवताना श्री. दांगट यांनी आणखी एका महत्वाकांक्षी व जगात क्रांतिकारी ठरू शकेल अशा उत्पादनाची निर्मिती केली आहे. त्यांनी "शुगरलीफ' ही साखर नुकतीच पुण्यातील बाजारपेठेत सादर केली आहे. लवकरच देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ती उपलब्ध केली जाणार आहे. उत्पादनाच्या संशोधनात आपल्यासह डॉ. सी. के. नंदगोपालन यांचा महत्वाचा वाटा आहे. त्याचबरोबर अनिल बात्रा, अजय जॉर्ज, मलिक मुल्ला यांनीही विशेष योगदान दिल्याचे श्री. दांगट यांनी सांगितले. 

काय आहे शुगरलीफ साखर? 

- हे उत्पादन म्हणजे कोणताही कृत्रिम स्वीटनर घटक नाही की स्टिव्हीया वा तत्सम वनस्पतीपासून बनवलेली साखर नाही. तर उसापासून बनवलेल्या साखरेमध्ये काही औषधी वनस्पतींचे अर्क  मिसळून तयार केलेले हे प्रक्रियायुक्त उत्पादन आहे. 
- मेथी, डाळिंब, दालचिनी, आवळा, काळी मिरी, हळद, आले आदींच्या अर्कांचा वापर 
- उत्पादन निर्मितीत रसायने किंवा सॉलव्हंट यांचा वापर नाही. 
- नेहमीच्या साखरेशी तुलना करायची तर शुगरलीफ हे उत्पादन जीआयचे प्रमाण तब्बल 25 टक्‍क्‍यांनी कमी करण्यास मदत करते. 
- औषधी वनन्पतींचे अर्क असल्याने शरीराला नैसर्गिक रित्या अँटीऑक्‍सीडंट मिळण्यास मदत होते. शरीरातील फ्रुक्‍टोज या साखरेचे होणारे प्रतिकूल परिणामही कमी होतात. 
- सुमारे दहा वर्षांच्या अथक संशोधनातून उत्पादनाची निर्मिती 
- भारतात आणि परदेशातील प्रयोगशाळांमध्येही उत्पादनाच्या झाल्या चाचण्या. कॅनडातील या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट प्रयोगशाळेकडून उत्पादन प्रमाणित 


आरोग्यदायी साखर 
आपल्या रोजच्या आहारात जी साखर असते त्यात ग्लायसेमिक इंडेक्‍स अर्थात जीआय उच्च प्रमाणात असतो. त्यामुळेच मधुमेह किंवा विविध विकारांना आमंत्रण मिळते. आमची साखर जगातली अशी पहिली साखर आहे की ज्यात जीआयचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तिचा स्वाद, चव मात्र अगदी नेहमीच्या साखरेसारखी आहे. रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते. चरबी वा तत्सम पदार्थांचे चयापचय अधिक कार्यक्षमतेने होते. ग्लुकोजचे चांगले शोषण होण्यासही मदत होते. म्हणून ही साखर अधिक आरोग्यदायी आहे. मधुमेहाला प्रतिबंध करण्यासाठी ती उपयोगी ठरेल, असे श्री. दांगट यांनी सांगितले. 
(संपर्क- विकास दांगट- 9822055498) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com