‘बेकायदा शुभेच्छा’ पडतील महागात !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

पुणे - तुमचा नेता, मित्र आणि नातेवाइकांना शुभेच्छा देण्यासाठी चौकाचौकांमध्ये फलक (फ्लेक्‍स) उभाराल, त्यावर शुभेच्छुक म्हणून तुमचे नाव ठळकपणे असेल; तसेच या फलकांसाठी महापालिकेची परवानगी घेतली नसेल, तर तुमच्याविरोधात (शुभेच्छुक) पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होईल. अशा प्रकारे बेकायदा फलकबाजी केलेल्या दीडशे जणांविरोधात महापालिका प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. त्यात सर्वाधिक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 

शहरात बेकायदा फलक उभारण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याकडे काणाडोळा करीत विशेषत: राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते बेकायदा फलक लावत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर विद्रूप होत असल्याकडे लक्ष वेधत बेकायदा फलक उभारणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले. त्यानुसार रस्ते आणि चौकाचौकांमध्ये बेकायदा फलक उभारल्याप्रकरणी ही करवाई करण्यात आली. फलकांची परवानगीची पाहणी करून पोलिसांकडे तक्रारी केल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

काही जण परवनागीपेक्षा अधिक मोठ्या आकाराचे फलक उभारत असल्याचेही कारवाई पथकाला दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीर तीन महिन्यांपासून शहर चकाचक करण्याची मोहीम हाती घेत, बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विशेषत: फलकांवर शुभेच्छुक म्हणून नावे असलेल्या व्यक्तींविरोधातच ही कारवाई करण्यात येत आहे.

महापालिकेकडून फलक उभारण्याला परवानगी दिली जाते. मात्र ती न घेताच जागोजागी अनेकांकडून फलक उभारण्यात येतात. त्याची पाहणी करून याआधी नोटिसाही बजाविण्यात आल्या होत्या. तरीही बेकायदा फलक उभारले जात आहेत. त्यावर कारवाई केली जात असून, फलकांवरील शुभेच्छुकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. 
- तुषार दौंडकर, प्रमुख, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका

Web Title: pune news digital flex board crime municipal