डिजिटल स्कूल चले हम...

मीनाक्षी गुरव
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

पुणे - ‘पाहूयात शरीरात काय आहे?’ हा धडा वाचताना काहीच कळत नव्हतं. खूप वेळा वाचलं, पण गोंधळ उडत होता; पण ‘डिजिटल बोर्ड’वर शिक्षिकेने क्‍लिप दाखविली आणि धडा कायमचा लक्षात राहिला’, असे चौथीत शिकणारी गाथा सांगत होती. ‘नेहमी आकर्षण असणाऱ्या फुलपाखराचा जन्म होतो कसा, यांसह ‘प्राण्यांचा जीवनक्रम’ कळला तो व्हिडिओद्वारे सांगितलेल्या गोष्टीतून’, असं सांगत रिद्धी फुलपाखराच्या गोष्टीत रमली. ‘‘हातात पुस्तक घेऊन शिकवायला लागलो ना, की ‘मुलांनो लक्ष द्या, शांत बसा’, असं सांगावं लागायचं; पण डिजिटल फळा ‘ऑन’ केला की सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष फळ्याकडे असते,’’ असा अनुभव शिक्षिका सांगत होत्या.

पुणे - ‘पाहूयात शरीरात काय आहे?’ हा धडा वाचताना काहीच कळत नव्हतं. खूप वेळा वाचलं, पण गोंधळ उडत होता; पण ‘डिजिटल बोर्ड’वर शिक्षिकेने क्‍लिप दाखविली आणि धडा कायमचा लक्षात राहिला’, असे चौथीत शिकणारी गाथा सांगत होती. ‘नेहमी आकर्षण असणाऱ्या फुलपाखराचा जन्म होतो कसा, यांसह ‘प्राण्यांचा जीवनक्रम’ कळला तो व्हिडिओद्वारे सांगितलेल्या गोष्टीतून’, असं सांगत रिद्धी फुलपाखराच्या गोष्टीत रमली. ‘‘हातात पुस्तक घेऊन शिकवायला लागलो ना, की ‘मुलांनो लक्ष द्या, शांत बसा’, असं सांगावं लागायचं; पण डिजिटल फळा ‘ऑन’ केला की सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष फळ्याकडे असते,’’ असा अनुभव शिक्षिका सांगत होत्या.

काही दशकांपूर्वी शाळांमध्ये काळा फळा आणि त्यावर पांढऱ्या खडूने लिहून शिकवलं जायचं. कालांतराने काळ्या फळ्याऐवजी हिरवा किंवा पांढरा फळा आला. आता तर शाळांमध्ये ‘ई-बोर्ड’ किंवा ‘डिजिटल बोर्ड’ आले आहेत. शहरातील बहुतांश शाळांमध्ये एक डिजिटल वर्ग असतो. पांढऱ्या स्क्रीनवर बोटाने किंवा विशिष्ट प्रकारच्या पेनच्या साहाय्याने लिहून, चित्र काढून शिकविले जाते. त्याच स्क्रीनवर चित्रफीत दाखवून विविध विषयांतील अभ्यासक्रम शिकविला जातो. सगळे वर्ग हे डिजिटल असणाऱ्या शाळांची संख्या मोजकीच आहे. शिक्षणाला अधिक प्रगत करण्यासाठी देशातील प्रत्येक शाळेत आणि वर्गात ‘डिजिटल बोर्ड’ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. या पार्श्‍वभूमीवर शहरातील शाळांमध्ये असणारे ‘डिजिटल बोर्ड’ आणि त्यातून अधिक सुकर झालेले शिक्षण याचा आढावा ‘सकाळ’ने घेतला आहे.

‘ई-बोर्ड’मुळे अभ्यास होतोय सोपा
शाळेत शिक्षिका पाठ्यपुस्तक हातात धरून फळ्यावर काही मुद्दे लिहून शिकवायच्या. त्याही काळात एखादा शिक्षक खूप रंगवून शिकवू लागला, की मुलांचे लक्ष वेधले जायचे; परंतु अशा शिक्षकांची संख्या तुलनेने कमी होती. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर शाळांमध्ये ‘डिजिटल बोर्ड’ आल्याने विद्यार्थ्यांमधील शिकण्याची उत्सुकता वाढत असल्याचा अनुभव शिक्षक सांगत आहेत. आचार्य श्री विजय वल्लभ माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी देसाई म्हणाल्या, ‘‘विज्ञान, गणित, भूगोल, इतिहास हे विषय ‘ई-बोर्ड’द्वारे शिकविल्यास मुलांना पटकन समजते. पाठ्यपुस्तक हातात घेऊन आणि फळ्यावर काही मुद्दे लिहून शिकविल्यास विद्यार्थ्यांना १० ते २० टक्के विषय कळतो; परंतु तोच धडा ग्राफिक्‍स, चित्रफीत, डिझाईन्सच्या साहाय्याने समजाविल्यास त्यातील संकल्पना ६५ ते ७० टक्के समजतात.’’

‘‘डिजिटल फळ्याद्वारे विद्यार्थ्यांचे शिकण्याकडे लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. तसेच, आकलनशक्ती वाढत असल्याचे जाणवते. पहिले ते चौथीच्या वर्गातील मुलांच्या विविध विषयांतील मूलभूत संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी हा फळा महत्त्वाचा वाटतो. कारण, या वयोगटातील विद्यार्थ्यांना रंगीत चित्र, चलचित्रांचे आकर्षण असते’’, असे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल खटावकर यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांचा स्वयंअध्ययनाकडे कल
‘‘आजकालची मुले टेक्‍नोसॅव्ही असून, त्यांना नेहमीच काही तरी नवीन शिकायला, पाहायला आवडते. विद्यार्थ्यांचा मित्र बनलेल्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेच त्यांना विविध विषयांतील धडे शिकविले, तर ते लक्ष देऊन शिकतात, असा आजवरचा अनुभव आहे. तसेच, डिजिटल फळ्यामुळे शिकण्यात विद्यार्थ्यांचा रस वाढत असून, त्या विषयातील आणखी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता वाढत आहे. त्यातूनच स्वयं अध्ययनाकडे ते वळू लागलेत,’’ असा अनुभव नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी सांगितला. तर शिक्षिका भाग्यश्री हजारे म्हणाल्या, ‘‘एखादे चित्र खूप काही बोलून जाते, त्याचधर्तीवर ‘ई-बोर्ड’द्वारे सहज शिकणे सोपे होत आहे. ई-लर्निंगचे सॉफ्टवेअर शाळेत आहे. त्या आधारे सर्व इयत्तांमधील धडे या फळ्यावर शिकविले जातात. काही शिक्षक विषयांना अनुसरून असणाऱ्या यू-ट्यूब किंवा अन्य संकेतस्थळांवर असणारी क्‍लिपिंगही फळ्यावर दाखवितात. त्यातून विद्यार्थी शिकण्याबरोबरच स्वयंअध्ययन करायला लागल्याचे दिसून येते.’’

Web Title: pune news digital school