देशी बनावटीच्या माळांचा दिवाळीपूर्वीच झगमगाट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे - दिवाळी जवळ येतीय तशी तनिष्का सदस्यांनी  नविलेल्या एलईडी दिव्यांच्या माळांची मागणी वाढत आहे. या उपक्रमातून अर्थार्जनाचे चांगले साधन उपलब्ध झाल्याच्या आनंदाने शहराबरोबरच ग्रामीण महिलांचेही जीवनमान उजळून निघाले आहे.

पुणे - दिवाळी जवळ येतीय तशी तनिष्का सदस्यांनी  नविलेल्या एलईडी दिव्यांच्या माळांची मागणी वाढत आहे. या उपक्रमातून अर्थार्जनाचे चांगले साधन उपलब्ध झाल्याच्या आनंदाने शहराबरोबरच ग्रामीण महिलांचेही जीवनमान उजळून निघाले आहे.

महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यासाठी; तसेच त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’च्या तनिष्का व्यासपीठाच्या वतीने सदस्या व अन्य महिलांना एलईडी दिव्यांच्या माळा बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सोशल मीडियावर होत असताना ‘सकाळ’ने पुढाकार घेऊन हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील बचत गटांनाही हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

प्रशिक्षणाची मोहीमच बाजारपेठेची स्थिती, तांत्रिक माहिती, प्रत्यक्ष प्रशिक्षण, माळा करण्याची संधी, सराव त्यानंतर असेम्बली प्रक्रिया अशा टप्प्याने प्रशिक्षण देण्यात आले. गेट माय सोल्यूशन कंपनीचे संचालक जयवंत महाजन यांनी प्रशिक्षणासाठी सहकार्य केले. पुणे शहरातील टिंगरेनगर, औंध, बुधवार पेठ, वडगाव शेरी, बिबवेवाडी, कर्वेनगर, धनकवडी, मांजरी, ससाणेनगर, हडपसर, कळस, सिंहगड रस्ता या ठिकाणी तर पिंपरीतील संत तुकारामनगर येथे प्रशिक्षण शिबिरे झाली. बारामती, कुंजीरवाडी, रांजणगाव, आळे फाटा, सासवडजवळील पानवडी व भोर तालुक्‍यातील नसरापूर येथील पन्नासहून अधिक महिला उत्तम प्रशिक्षक बनल्या असून, त्या अन्य महिलांना प्रशिक्षण देऊ लागल्या आहेत. लातूरच्या तनिष्का सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यातून तनिष्का सदस्या रवाना झाल्या आहेत. यंदाची दिवाळी स्वदेशी दिवाळी साजरी करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर असलेल्या नवविवाहित दांपत्याबरोबरच मांढरदेवच्या पायथ्याशी दुर्गम भागात राहणाऱ्या महिलाही आता या माळा बनवतात. पुण्यातील तनिष्का एकत्र येऊन माळा बनवत आहेत. गणेशोत्सवात तनिष्कांच्या माळा यंदा झगमगल्या. नवरात्रात मागणी वाढली आणि दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर मोठा प्रतिसाद मिळत आहे.

महापौरांकडून तनिष्कांचे कौतुक
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी तनिष्का गटप्रमुख माधुरी गिरमकर यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प भागात सुरू असलेल्या माळा बनविण्याच्या केंद्राला भेट दिली. त्या वेळी तनिष्का सदस्यांनी त्यांना संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली. तनिष्कांनी सुरू केलेली ही चळवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडियाच्या घोषणेचे तंतोतंत पालन करणारी आहे, अशा शब्दांत टिळक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

आयुष्यात पहिल्यांदाच कौशल्य प्रशिक्षण घेतले. त्यातून अर्थार्जनाची चांगली संधी मिळाली. मार्केटिंगही करतोय. चांगला प्रतिसाद मिळतोय. यामुळे आमच्या कुटुंबातील दिवाळी यंदा अधिक उजळेल. या उपक्रमामुळे आम्हाला आर्थिक सुरक्षितता मिळाली असून, त्यामुळे समाजात प्रतिष्ठाही प्राप्त झाली आहे. 
- सविता ठाकूर, प्रियांका भंडार, कॅम्प

संसाराच्या गाड्याला आपलाही हातभार लागावा, या हेतूने दोन पैसे मिळवावेत याच प्रयत्नांत होते. एलईडीचे प्रशिक्षण मिळाले अन्‌ ती संधी गवसली. छोटासा का होईना
स्वयंरोजगार मिळाला. 
-स्नेहा चौरे, टिंगरेनगर

Web Title: pune news diwali festival