स्वच्छता अभियानामुळे "लक्ष्मी'ला "अच्छे दिन' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

पुणे -  आश्‍विन वद्य अमावास्येला लक्ष्मी म्हणून केरसुणीची पूजा करतात. अवघ्या दोन दिवसांवर दिवाळी आल्याने परप्रांतांतून महाराष्ट्राच्या सेवेला आलेल्या "लक्ष्मी'चा भावही वधारला आहे. त्यातच केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानामुळे "लक्ष्मी'ला गेल्या तीन वर्षांपासून "अच्छे दिन' आले आहेत. शिंदळीच्या पानांपासून बनविलेल्या हात शिवणीच्या "लक्ष्मी'लाच (केरसुणी) पूजेमध्ये विशेष स्थान असते. त्यामुळे परराज्यांतून "लक्ष्मी'ची लाखोंच्या पटीत आवक झाली असून, संस्था, रुग्णालये, शाळा, महाविद्यालयांसह घरोघरी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे. 

आश्‍विन-कार्तिकातील दिवाळी पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहे. गुरुवारी (ता. 19) आश्‍विन वद्य अमावास्या आहे. आधुनिकतेसोबतच पारंपरिक पद्धतीने सण-उत्सव साजरे करण्याची भारतीय परंपरा उत्साहात जपली जाते. लक्ष्मीपूजनाकरिता दरवर्षी आंध्र प्रदेश, कर्नाटकसह महाराष्ट्रातील सोलापूरमधून तयार "लक्ष्मी' (केरसुणी) मागविण्यात येते. लक्ष्मीपूजनानिमित्त बाजारात तीन इंचांपासून 23 इंचांपर्यंतच्या "लक्ष्मी' आल्या आहेत. 

विक्रेते सोमनाथ मोरे म्हणाले, ""महाराष्ट्रात केरसुण्यांचे उत्पादन दहा-वीस टक्केच होते. त्यामुळे परराज्यांतूनच केरसुणी मागवावी लागते. वर्षभर केरसुणीला मागणी असते. मात्र दिवाळीत केरसुणीची "लक्ष्मी' म्हणून पूजा करतात. त्यामुळे नागरिक नवी केरसुणी खरेदी करतातच. पूर्वी निवडुंगाच्या झाडापासून तयार केलेले वाक आणि सुतळीने केरसुणीची बांधणी होत असे. आता मात्र नायलॉनच्या दोऱ्यांनी बांधणी होत असून, या केरसुण्या हलक्‍या असतात. यंदा मध्य प्रदेशातून लाकडी दांड्याच्या केरसुण्या आल्या आहेत. दिवाळीकरिता आम्ही पोत्यांनी "लक्ष्मी' मागवितो. शंभर, दीडशे, दोनशे नगांची पोती असतात. पुण्यात लाखोंच्या पटीत लक्ष्मीपूजनासाठी केरसुणीची खरेदी-विक्री होते.'' 

विक्रेते शिवाजी सावंत म्हणाले, ""केरसुणीची खरेदी-विक्री हा बुरूड समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. अगदी आठ रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत "लक्ष्मी' उपलब्ध आहेत. गरीब असो की श्रीमंत दिवाळीत "लक्ष्मी'ची पूजा करतोच. आंध्र प्रदेश, कर्नाटक येथे केरसुण्या बनविणारे कारागीर आहेत. केंद्राने स्वच्छता अभियान सुरू केल्यापासून केरसुणीला मागणी वाढली आहे. विविध धर्मीय नागरिकही श्रद्धेने "लक्ष्मी'चे पूजन करतात. त्यामुळे केरसुणीला दिवाळीसह वर्षभर मोठ्या प्रमाणात उठाव असतो. या "लक्ष्मी'मुळेच अनेकांना समाधानकारक "लक्ष्मी' प्राप्त होते.''

Web Title: pune news diwali festival