लक्ष्मीच्या स्वागतासाठी लगबग 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

पुणे - आश्‍विन वद्य अमावास्येला लक्ष्मी व कुबेर पूजनाकरिता विड्याची पाने, नारळ, आंब्याच्या डहाळ्या, कमळ आणि लक्ष्मीच्या प्रतिमांसह केरसुणी (लक्ष्मी), तसेच चिंच, आवळा, ऊस आणि पूजा साहित्याने सजलेल्या बाजारपेठेत बहुसंख्य पुणेकरांनी नरकचतुर्दशीला खरेदीचा मुहूर्त साधला. खरेदीदार आणि विक्रेतेही "लक्ष्मी'च्या स्वागताप्रीत्यर्थ तयारीला लागले असून, संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण आहे. 

पुणे - आश्‍विन वद्य अमावास्येला लक्ष्मी व कुबेर पूजनाकरिता विड्याची पाने, नारळ, आंब्याच्या डहाळ्या, कमळ आणि लक्ष्मीच्या प्रतिमांसह केरसुणी (लक्ष्मी), तसेच चिंच, आवळा, ऊस आणि पूजा साहित्याने सजलेल्या बाजारपेठेत बहुसंख्य पुणेकरांनी नरकचतुर्दशीला खरेदीचा मुहूर्त साधला. खरेदीदार आणि विक्रेतेही "लक्ष्मी'च्या स्वागताप्रीत्यर्थ तयारीला लागले असून, संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण आहे. 

आश्‍विन अमावास्या उद्या (ता. 19) आहे. ऐश्‍वर्य, समृद्धीचे प्रतीक "लक्ष्मी'चे उत्साहात आणि आनंदात पूजन करायचे. घरच्यांसमवेत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करायचा म्हणून अनेकविध वस्तूंच्या खरेदीसाठी पुणेकर बुधवारी घराबाहेर पडले होते. मध्यवर्ती भागातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांच्या वर्दळीमुळे गर्दीच गर्दी अनुभवायला मिळाली. महात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसर, नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौक, लक्ष्मी रस्ता त्याचप्रमाणे शहराच्या अनेक भागांत पथाऱ्या मांडून झेंडू, पणत्या, आकाशदिवे, साळीच्या लाह्या, रंगीबेरंगी रांगोळ्या, बत्तासे, साखरेची चित्रे मांडली आहेत. नागरिकांनी सोईनुसार ठिकठिकाणी खरेदीचा आनंद घेतला. 

लक्ष्मीपूजनाकरिता शाडू आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या लक्ष्मीच्या मूर्तीदेखील विक्रीस आल्या आहेत. पूजेकरिता सोन्या-चांदीच्या लक्ष्मी खरेदीसाठी सराफी पेढ्यांवर गर्दी होती, तर कष्टकऱ्यांसह मध्यमवर्गीय नागरिक शाडू किंवा पीओपीच्या लक्ष्मीच्या मूर्ती पूजेकरिता खरेदी करत होते. दिवाळीनिमित्ताने मूर्ती घडविणाऱ्या कलाकारांनादेखील रोजगार मिळत आहे. 

विक्रेते बापू यादव म्हणाले, ""सहा इंचांपासून अडीच फुटापर्यंतच्या मूर्ती बाजारात आल्या आहेत. साठ रुपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत किमतीच्या मूर्ती आहेत. कष्टकरी व मजूर वर्गासहित मध्यमवर्गीय नागरिक त्यांना परवडतील अशा साठ ते शंभर रुपयांच्या मूर्ती खरेदी करतात; पण गेल्या काही वर्षांपासून लक्ष्मीपूजनाकरिता लक्ष्मीच्या मूर्ती खरेदीकडेही नागरिकांचा कल वाढू लागला आहे.'' 

विक्रेत्या वत्सला काटे म्हणाल्या, ""लक्ष्मीपूजनासाठी नवी केरसुणी (लक्ष्मी), साखरेची चित्रे, बत्तासे आणि साळीच्या लाह्यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अगदी दहा-पंधरा रुपयांपासून वेगवेगळ्या वस्तू बाजारपेठेत उपलब्ध आहेत. पूजेकरिता नागरिक आवर्जून खरेदी करतात. समाधानकारक खरेदी- विक्रीमुळे प्रत्येकाचीच दिवाळी चांगली होते.'' 

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त 
समृद्धीचे प्रतीक म्हणून लक्ष्मी व कुबेरपूजनात साळीच्या लाह्या, बत्तासे, झेंडूची फुले असावीत. पूजनासाठी घर, दुकान स्वच्छ करून सुशोभित करावे. लक्ष्मीपूजनासाठी उद्या (ता. 19) सायंकाळी चार वाजून 45 मिनिटांपासून रात्री आठ वाजून 40 मिनिटांपर्यंत आणि रात्री नऊ वाजून 35 मिनिटांपासून 11 वाजून 55 मिनिटांपर्यंतचा सुमुहूर्त आहे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

Web Title: pune news diwali festival