फॅन्सी फटाके वाजविताना काळजी घ्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

ही काळजी घ्या 
- फटाके वाजविताना चेहरा फटक्‍यावर घेऊ नका 
- भुईनळे, बाण यासारखे फटाके हाताने उडवू नका 
- डोळ्याला इजा झाल्यास डोळा चोळू नका 
- डोळ्यात फटाक्‍याचा कण गेल्यास डोळा स्वच्छ पाण्याने धुवा 
- डोळ्यात जखम झाल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या 

पुणे - दिवाळीत कानठळ्या बसविणाऱ्या आवाजापेक्षा फॅन्सी फटाके वाजविण्याकडे पुणेकरांचा कल वाढत असला तरीही त्यातून डोळ्यांना इजा झाल्याचे प्रकार वाढत आहेत. याबाबत काळजी घेण्याचे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे. 

शहरात गेल्या काही वर्षांपासून आवाजाचे फटाके वाजविण्याचे प्रमाण वेगाने कमी झाल्याचे दिसत आहे; पण त्याची जागा फॅन्सी फटाक्‍यांनी घेतली आहे. दीपोत्सव सुरक्षितपणे साजरा करण्यासाठी फटाके वाजविताना डोळ्यांना इजा होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. 

बॉडरलेस वर्ल्ड फाउंडेशनतर्फे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. एस. नटराजन म्हणाले, ""दिवाळीमध्ये वाजवल्या जाणाऱ्या फटाक्‍यांमुळे डोळ्यांना इजा होण्याचे प्रमाण जास्त असते. बहुतांश वेळा या इजांमुळे रुग्णाला अंशतः अथवा पूर्णपणे अंधत्व येते. त्यामुळेच दिवाळीमध्ये फटाके वाजविण्यावर बंदी आणावी.'' 

डॉ. नटराजन म्हणाले, ""लहान मुलांमध्ये फटाके वाजविण्याची मोठी उत्सुकता असते; मात्र यासाठी योग्य ती काळजी घेतली जात नाही. मोठ्या आवाजाचे फटाके गंमत म्हणून नारळाच्या करवंटीमध्ये, काचेच्या वस्तूमध्ये, तर रॉकेटसारखे फटाके काचेच्या बाटलीत ठेवून वाजविले जातात. या वस्तू फूटून त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना डोळ्यांना इजा होण्याचे प्रमाण जास्त असते.'' 

दिवाळीदरम्यान रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण डोळ्याला इजा झालेले असतात. अशा रुग्णांवर उपचार केले तरी ते पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाण अत्यल्प असते. यापैकी काही रुग्णांना अंशतः अंधत्व येते, तर काहींना पूर्णपणे अंधत्व येते. डोळा या नाजूक अवयवावर उपचारही अवघड असतात. यामुळेच त्याची काळजी घेणे अत्यावश्‍यक असते, असेही डॉ. नटराजन यांनी सांगितले. 

राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेचे नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर म्हणाले, ""फटाके वाजविताना स्वतःची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी लहान मुले फटाके वाजवत असताना सोबत पालकांनी असणे आवश्‍यक आहे.'' 

Web Title: pune news diwali festival Be careful fancy firecrackers