भेटकार्डांची परंपरा कायम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी 
वर्ष - आलेली भेटकार्ड - वितरित झालेली भेटकार्ड 
2014 - 15,10,632 - 13,52,145 
2015 - 14,22,503 - 13,75,412 
2016 - 14,39,852 - 13,11,512 

पुणे - आप्तेष्ट, मित्र-मैत्रिणींना भेटकार्ड पाठवून दिवाळीच्या शुभेच्छा देण्याची परंपरा आजही सुरू आहे. टपाल विभागातर्फेही यानिमित्त भेटकार्ड स्वीकारण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येते. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे व्यक्तिगत भेटकार्ड पाठविण्याचे प्रमाण काहीअंशी कमी होऊ लागले असले तरीही बॅंका, कंपन्या, सामाजिक संस्थांतर्फे अजूनही टपालाद्वारे भेटकार्ड पाठविण्यात येतात. पुणे विभागात दरवर्षी सरासरी साडेतेरा लाख भेटकार्डांचे वितरण होते. त्यासाठी विभागातील वीस कार्यालयांत भेटकार्ड स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. 

फेसबुक, ई-मेल, व्हॉट्‌सऍप, इंस्टाग्रामद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात येऊ लागल्या तसे टपालाद्वारे व्यक्तिगत स्वरूपात भेटकार्ड पाठविण्याचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण टपाल कर्मचाऱ्यांनी नोंदविले आहे. दरवर्षी सरासरी साडेचौदा लाख भेटकार्ड टपाल कार्यालयातर्फे स्वीकारण्यात येतात. त्यापैकी साडेतेरा लाख भेटकार्ड वितरित होतात. यंदाही नागरिकांना नातेवाईक व मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देता याव्यात याकरिता टपाल खात्याने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. नागरिकांना स्पीड पोस्टाद्वारेही भेटकार्ड पाठविता येऊ शकतील. 

जीपीओ, सिटी पोस्ट, खडकी, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, येरवडा, गणेशखिंड, पर्वती, हडपसर, मॉडेल कॉलनी, पिंपरी, चिंचवड (पूर्व), भोसरी, स. प. महाविद्यालय, चिंचवडगाव, आकुर्डी, माजी सैनिक कॉलनी, पीएनसीटी, एनआयबीएम येथील टपाल कार्यालयात ही सुविधा केली आहे. 

याबाबत सहायक पोस्ट मास्तर जनरल एफ. बी. सय्यद म्हणाले, ""भेटकार्ड पाठविणाऱ्यांचे प्रमाण स्थिर आहे. व्यापारी, पतसंस्था, बॅंका, ई-कॉमर्स कंपन्या, खासगी, सार्वजनिक कंपन्या अजूनही टपालाद्वारे भेटकार्ड पाठवितात. सर्वच प्रकारची भेटकार्ड एकत्रितरीत्या टपाल खाते स्वीकारते. मात्र सोशल मीडियामुळे व्यक्तिगत भेटकार्ड पाठविण्याचे प्रमाण काहीअंशी कमी झाले आहे. सरासरी साडेतेरा लाख भेटकार्ड दरवर्षी वितरित होतात, ही संख्या कमी नाही.'' 

Web Title: pune news diwali festival Greeting Cards