पणत्या-दिव्यांनी बाजारपेठ उजळली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पणत्या २० ते ४० रुपये डझन
साध्या पणत्यांची किंमत २० रुपये डझन असून, डिझायनर पणत्या ३० ते ४० रुपये डझन आहेत. फॅन्सी सहा पणत्यांच्या पॉकेटची किंमत ४० रुपये आणि साध्या पणत्यांच्या पॉकेटची किंमत ३० रुपये आहे. विविध कंपन्यांकडून रंगीत पणत्यांची मागणी होत आहे.

पुणे - दिवाळीनिमित्त गुजरात आणि राजस्थानातील खास लाल आणि चिनी मातीतील पणत्यांसह नक्षीकाम केलेल्या दिव्यांनी बाजारपेठ उजळली आहे. तेजोमय प्रकाशाने आपले घर आणि अंगण उजळावे, यासाठी पणत्या-दिव्यांचे नवनवीन प्रकार बाजारपेठेत आले आहेत. पान, शंख, चौरंग, वृक्ष, स्वस्तिक अशा विविध प्रकारच्या दिव्यांसह आकर्षक रंगकाम केलेल्या पणत्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.

पणत्या, नंदादीप, दीपमाळांनी बाजारपेठ सजली असून, यंदा फॅन्सी दिवे आणि नक्षीकाम असलेल्या पणत्यांना मोठी मागणी आहे. हत्ती, मोर, शंख, कळस, वृंदावन, बैल-जोडी, मंदिर, बंगला, झोपडी, वृक्ष, मोदक, मासे, कासव असे प्रकार आहेत. वॉल हॅंगिंग दिवे आणि काचेच्या दिव्यांनाही पसंती मिळत आहे. 

सूर्यफूल, श्री, फूल, गणपती, मंदिर, नारळ, पाच आणि सात या अंकांच्या, तसेच पाने, फुले, शंख, स्वस्तिक, कलश, चांदणी, फुलपाखरू, मोरपीस आदी आकारांच्या पणत्या, लामणदिवे, मातीचे आकाशकंदील व रंगीत दीपमाळा बाजारात दिसत आहेत. गणपती, उंट, गुलाब फुलांच्या आकारातील पणती, डोम पणती, चिनी मातीच्या चमकदार पणत्या, कटिंग दीपमाळ, पाण्यावर तरंगणाऱ्या पणत्या आदींचा समावेश आहे.

दिवे, पणत्या बनवणे हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे. आम्ही पणत्या-दिवे तयार करण्यासह रंगकामही करतो. यंदा डिझायनर पणत्या-दिव्यांना सर्वाधिक मागणी आहे. यात भरपूर नवीन प्रकार उपलब्ध झाले असून, त्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे.
- स्वप्नाली शिंदे, कुंभारवाड्यातील व्यावसायिक 

फॅन्सी पणत्यांमध्ये विविध प्रकार आहेत. त्यात बासरी, मोर, चौरंग, षटकोन असे प्रकार पाहता येतील.
- ज्योती शिंदे, व्यावसायिक

Web Title: pune news diwali festival lamp