पुणेकरांसाठी शब्द-सुरांची मेजवानी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज पाऊस कोसळत आहे. त्यामुळे यंदाच्या "दिवाळी पहाट'वरही पावसाचे सावट आहे, हे लक्षात घेऊन अनेक आयोजकांनी बंदिस्त सभागृहात कार्यक्रम आयोजित केले आहेत. तर, मोकळ्या मैदानावर होणाऱ्या मैफलीतील मांडवावर पत्रे टाकण्याची तयारीही काहींनी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

पुणे - दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव. हा आनंद द्विगुणित होतो तो "दिवाळी पहाट'मुळे. म्हणूनच शहराच्या वेगवेगळ्या भागांत यंदाही शब्द-सुरांच्या मैफली रंगणार आहेत. यानिमित्ताने श्रोत्यांसाठी अनोखी "मेजवानी'च उपलब्ध झाली आहे. त्यात सहभागी होऊन कलेचा मनमुराद "आस्वाद' घेता येणार आहे.

पुण्यात सुरू झालेली "दिवाळी पहाट'ची परंपरा आता महाराष्ट्रभर पसरली आहे. तरीसुद्धा दिवाळीत कोणकोणते गायक आपली कला सादर करणार, हा उत्सुकतेचाच विषय असतो. प्रायोजकांच्या पाठबळामुळे पूर्वी बहुतांश कार्यक्रम विनामूल्य असायचे; पण प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन, अनेक आयोजकांनी आता प्रवेशशुल्क आकारायला सुरवात केली आहे. तरीसुद्धा काही संस्थांनी विनामूल्य "दिवाळी पहाट'ची आपली परंपरा कायम ठेवली असून, उद्यापासून (ता. 16) या मैफली शहरात रंगणार आहेत.

लायन्स क्‍लबच्या वतीने होणाऱ्या "दिवाळी पहाट'मध्ये शास्त्रीय गायिका डॉ. रेवा नातू आणि यादवराज फड हे गायक सहभागी होणार आहेत. त्यांची गायन मैफल उद्या (ता. 16) पहाटे साडेपाच वाजता अण्णा भाऊ साठे सभागृहात होणार आहे. यात भक्तिगीत- नाट्यगीत ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे.

गाण्यांबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण वादनही "दिवाळी पहाट'मध्ये दरवर्षी ऐकायला मिळते. रॉयल हार्मोनिका क्‍लब प्रस्तुत "दिवाळी पहाट'मध्ये माउथ ऑर्गन या वाद्यावर वेगवेगळे ड्युएट्‌स सादर होणार आहेत. अनेक वादक यात सहभागी होणार असल्याने ही मैफल वेगळी ठरणार आहे. ती निवारा सभागृहात बुधवारी (ता. 18) सकाळी साडेसहा वाजता सादर होईल.

दरवर्षीप्रमाणे यंदाही "यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान'तर्फे सारसबागेत "रंगारंग दिवाळी पहाट' साजरी केली जाणार आहे. तुकाराम दैठणकर यांच्या सुमधुर सनईवादनाने कार्यक्रमाची सुरवात होणार आहे. त्यानंतर आर्य काकडे आणि आर्य अनसलकर हे ताशावादन सादर करतील. वादनानंतर हिंदी- मराठी गीतांची मैफल श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. त्यात संजीव मेहेंदळे, चित्रा जोशी- आपटे, मिलिंद गुणे, केदार तळणीकर, सचिन वाघमारे, मंदार देव, ऋतुराज कोरे, मंजुश्री ओक, मोहित वांकर हे गायक- कलावंत गाणी सादर करणार आहेत. सारसबागेत गुरुवारी (ता. 19) पहाटे पाच वाजता हा कार्यक्रम सादर होईल.

संवाद आणि आम्ही एकपात्री संस्थेतर्फे "रंगारंग दिवाळी पहाट' हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. एकपात्री कला, गाणी, नृत्य, वादन अशा विविध कलांचा संगम असलेल्या या मैफलीत उमा नेने, वंदन राम नगरकर, मधुरा गोडसे, संतोष चोरडिया हे कलावंत सहभागी होणार आहेत. ही मैफल गुरुवारी (ता. 19) सकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सादर होणार आहे. या वेळी उपेक्षित, वंचित घटकातील नागरिकांचा सन्मानही करण्यात येणार आहे.

सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे होणारी "स्वरमयी दिवाळी पहाट' हिंदी- मराठी गाणी, नृत्य, हास्यविनोदाने रंगणार आहे. या मैफलीत राधा मंगेशकर, प्रज्ञा देशपांडे, मनीषा लताड, राजेश दातार हे गायक सहभागी होणार आहेत.

शनिवारवाडा पटांगणावर शुक्रवारी (ता. 20) पहाटे साडेपाच वाजता ही मैफल होणार आहे. चितळे बंधू (पिंपळे सौदागर) यांच्यावतीने आयोजित "स्वररंग दिवाळी पहाट' मैफलीत गायक भुवनेश कोमकली आणि गायिका आरती ठाकूर- कुंडलकर यांचे गायन ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्यांना सुयोग कुंडलकर आणि रोहित मुजुमदार हे साथ करणार आहेत. पिंपळे सौदागर येथील चितळे बंधू यांच्या संस्थेत शनिवारी (ता. 21) सकाळी सहा वाजता ही मैफल होणार आहे.

पावसामुळे दक्षता
गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज पाऊस कोसळत आहे. त्यामुळे यंदाच्या "दिवाळी पहाट'वरही पावसाचे सावट आहे, हे लक्षात घेऊन अनेक आयोजकांनी बंदिस्त सभागृहात कार्यक्रम आयोजित केले आहेत. तर, मोकळ्या मैदानावर होणाऱ्या मैफलीतील मांडवावर पत्रे टाकण्याची तयारीही काहींनी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

Web Title: pune news: diwali festival music