यंदाची दिवाळी गेल्या तीन वर्षांत ‘शांत’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

पुणे - फटाके उडवण्यावर न्यायालयाने घातलेली बंधने, सामाजिक संस्थांकडून फटाके उडवण्याबद्दल वारंवार होत असलेली जनजागृती, याचा परिणाम दिवाळीत जाणवू लागला आहे. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या दिशेने नागरिकांच्या मानसिकतेत बदल घडू लागल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या मागील तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार पुणे व पिंपरी- चिंचवडमध्ये यंदाच्या वर्षी दिवाळीत फटाके उडवण्याचे प्रमाण घटले असून, ते ७९.३ टक्‍क्‍यांवर आले आहे. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पुणे शहरातील कोथरूड, विश्रांतवाडी, सारसबाग, लक्ष्मी रस्ता, महात्मा फुले मंडई, शनिवारवाडा परिसर, कोरेगाव पार्क, स्वारगेट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता, औंध, थेरगाव, शिवाजीनगर अशा विविध ठिकाणी दिवाळीत प्रदूषण चाचणी घेण्यात आली. २०१६ मध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके उडवण्याचे प्रमाण ९१.२ टक्के, तर संपूर्ण दिवाळीत ८३.२ टक्के इतके होते. २०१५ मध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे प्रमाण ८४.६ टक्के होते, ते संपूर्ण दिवाळीत ७९.५ टक्‍क्‍यांवर आले. यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ९३.७ टक्के प्रमाण होते, संपूर्ण दिवाळीत घटून ते ७९.३ टक्‍क्‍यांवर आले आहे. त्यावरून यंदा फटाके उडवण्याचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच दिवाळीपूर्वी पावसाने हजेरी लावल्याने फटाके खरेदी- विक्रीसाठी जेमतेम चार-पाच दिवसच मिळाले. सर्वोच्च न्यायालयाने रहिवासी क्षेत्रात फटाके विक्रीवर निर्बंध लादले होते, त्याचाही परिणाम यंदाच्या दिवाळीत जाणवला. 

एकंदरीतच फटाके उडवण्यापेक्षा घरोघरी फराळ करीत दिवाळी साजरी करण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे दिसते आहे. लक्ष्मीपूजनाचा अपवाद वगळता वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबिजेला फटाके उडविण्याचे प्रमाण तुलनेने कमी होत चालले आहे. मात्र, एका दिवसाचा विचार करण्यापेक्षा संपूर्ण दिवाळीचा विचार करून फटाके उडवण्यापेक्षा प्रदूषण कसे कमी होईल, याकरिता पुणेकर स्वतःहून सहभागी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: pune news diwali relax