महिला कर्मचाऱ्यांना साडीचोळी देऊन साजरी केली भाऊबीज...

मिलिंद संधान
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

ठेकेदाराकडून वेळेवर पगार न देणे, काम करताना लागणारे हातमोजे, मास्क यासारख्या वस्तुंचा अभाव याकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधले. 

नवी सांगवी : पिंपळे गुरव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना साडीचोळी देऊन भाऊबीज साजरी करण्यात आली. माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास परिसरातील महापालिकेतील महिला कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होता.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, शिवाजी पाडुळे, विजय गणपतराव जगताप, शाम जगताप, तानाजी जवळकर, विजय चोरमले, सुमन माने यांच्या हस्ते बहुसंख्य महिला भगिनींना साडीचोळी, दिपावली साहित्य, मिठाई तर पुरुषांना पूर्ण पोषाख देण्यात आला. यावेळी या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यथाही मांडल्या. ठेकेदाराकडून वेळेवर पगार न देणे, काम करताना लागणारे हातमोजे, मास्क यासारख्या वस्तुंचा अभाव याकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधले. 

माजी नगरसेवक जगताप म्हणाले, "आम्ही सत्तेत असो अगर नसू जनसामान्यांची कामे करीत रहाणार. शहराचे सार्वजनिक आरोग्य सांभाळणाऱ्या व स्वच्छता दूत म्हणून कार्य करणाऱ्या माझ्या माय भगिनींना साडीचोळी बरोबर त्यांना महापालिकेकडून रास्त न्याय देणे हीच खरी माझी भाऊबीज असणार आहे. " 

स्थायी समिती माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे म्हणाले, " किमान वेतन कायद्यानुसार या स्वच्छतेच्या दूतांना पगार मिळणे अपेक्षित असताना ठेकेदार तासाप्रमाणे पगार देऊन त्यांची पिळवनुक करीत आहे. महापालिकेकडून काढल्या जाणाऱ्या निविदेतील सूचनांचे पालन न करता ठेकेदार मात्र या लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे. " 

दरम्यान कै गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने परिसरातील महिला बचत गटांना दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे विश्वस्त व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या हस्ते परिसरातील दिडशेहून अधिक बचत गट व महिला मंडळांना उटणे, उदबत्ती, पणत्या, रांगोळी साहित्य वाटण्यात आले. 

Web Title: pune news diwali sweeper women employees gifted with sari