परीक्षेतील चुकीला माफी नाही!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

पुणे - राज्य शिक्षक पात्रता परीक्षेत (सेट) उत्तरपत्रिकेवर बैठक क्रमांक, प्रश्‍नपत्रिकेचा संकेतांक आणि विषयांचा संकेतांक भरताना विद्यार्थ्यांकडून म्हणजे भावी शिक्षकांकडून झालेल्या चुका माफ करता येणार नाहीत, अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतली आहे. त्यामुळे आता निकालात कोणताही बदल करता येणार नाही, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

पुणे - राज्य शिक्षक पात्रता परीक्षेत (सेट) उत्तरपत्रिकेवर बैठक क्रमांक, प्रश्‍नपत्रिकेचा संकेतांक आणि विषयांचा संकेतांक भरताना विद्यार्थ्यांकडून म्हणजे भावी शिक्षकांकडून झालेल्या चुका माफ करता येणार नाहीत, अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतली आहे. त्यामुळे आता निकालात कोणताही बदल करता येणार नाही, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाने १६ एप्रिल रोजी सेटची परीक्षा घेतली होती. उत्तरपत्रिकांवर (ओएमआर शीट) बैठक क्रमांक, प्रश्‍नपत्रिकेचा संकेतांक आणि विषयांचा संकेतांक योग्य पद्धतीने नोंदविणे, त्या समोरील वर्तुळे शाईने भरणे बंधनकारक होते. त्यात चुका झाल्यास त्या उत्तरपत्रिका तपासल्या जाणार नाहीत, अशा सूचना विद्यापीठाने आधीच दिल्या होत्या. तरीही त्रुटी राहिल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.

परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे दहा टक्के म्हणजे सात हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये चुका झाल्याने त्यांना त्या विषयात शून्य गुण देण्यात आले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आक्रमक होत आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यांनी उपोषण केल्यानंतर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी या प्रश्‍नी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे लेखी विचारणा केली होती. आयोगाने परवानगी दिल्यास या विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नपत्रिका व्यक्तीकडून (मॅन्युअल) तपासून दिल्या जातील, असे सांगितले होते.

निकालात बदल नाही
याबाबत कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम म्हणाले, ‘‘आयोगाने सेटच्या निकालात बदल करता येणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे विद्यापीठाची भूमिकाही तशीच राहील. विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिकांवर माहिती भरताना चुका राहिल्यास निकालात बदल होणार नाही. शिक्षकाचे काम हे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे असते. त्यांच्याकडून माहिती भरताना चुका होणे अपेक्षित नाही. या चुका विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेला घातक ठरू शकतात, असे आयोगाने म्हटले आहे.’’

परीक्षा द्यावी लागणार
सेटच्या उत्तरपत्रिकेत चुका करणाऱ्या भावी शिक्षकांची संख्या सात हजारांच्या घरात आहे. विद्यापीठ अनुदान आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्ट भूमिका घेतल्याने या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होणारी परीक्षा द्यावी लागणार आहे.

Web Title: pune news Do not miss forgiveness!