चौकशी समित्यांचे लाड पुरवू नका - डॉ. अनिल सहस्रबुद्धे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

पुणे - ‘‘शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार हे मोठे आव्हान आहे. शिक्षण संस्थांनी गैरव्यवहार रोखण्याची सुरवात स्वत:पासून सुरू करावी. महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या चौकशी समित्यांचे लाड करू नका. त्यांच्या मनाप्रमाणे ‘तारांकित’ सोयी-सुविधा आणि त्यांना भेटी देणे थांबवा. अशा प्रकारांना थारा न देता, त्याची योग्य ठिकाणी तक्रार करा,’’ असे आवाहन अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले. 

‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या संस्थापक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष विकास काकतकर, कार्यवाह प्रा. आनंद भिडे, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. सहस्रबुद्धे यांनी स्वच्छ, गरिबीमुक्त, भ्रष्टाचारमुक्‍त भारत निर्माण करण्यासाठी उपस्थितांना शपथ दिली. 

डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘संस्कारक्षम नागरिक बनविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी अभ्यासक्रमात संस्काराशी संबंधित घटकांचा समावेश करण्याची आवश्‍यकता आहे. पुणे विद्यापीठाने त्यासाठी पाऊल टाकले आहे. विद्यापीठाचा मानांकित संस्थांमध्ये देशात दहावा क्रमांक लागतो. त्यामुळे केंद्र सरकार दर्जावृद्धीसाठी निवडणार असलेल्या पहिल्या संस्थांमध्ये विद्यापीठाचा नक्‍कीच समावेश होईल. त्यासाठी संलग्न महाविद्यालयांचा सहभाग महत्त्वाचा आहे.’’ डॉ. चित्रा श्रीधरन यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नितीन कुलकर्णी यांनी आभार मानले. ज्येष्ठ मूर्तिकार गणेश निसाळ यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करीत संस्थेला देणगी दिली.

देशातील विद्यापीठे जागतिक क्रमवारीत नाहीत. ही विद्यापीठे उच्च दर्जाची व्हावीत, यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी सरकारी व खासगी क्षेत्रातील प्रत्येकी दहा संस्थांना चांगली संधी मिळणार आहे. त्यांना निधी दिला जाईल. दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण संस्थांनी स्वतःशीच स्पर्धा केली पाहिजे. चांगल्या संस्थांनी इतरांचा दर्जा सुधारण्यासाठी मदत करावी. परिषदेने या कामी मार्गदर्शक ही योजना सुरू केली आहे.
- डॉ. अनिल सहस्रबुद्धे, अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद

Web Title: pune news dr. anil sahasrabudhe talking