‘ऑडिओ गाइड’द्वारे ऐका बाबासाहेबांची जीवनपद्धती

पांडुरंग सरोदे
बुधवार, 6 डिसेंबर 2017

पुणे - ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाश्‍चात्त्य जीवनपद्धतीनुसार भोजनाची आवड होती. त्यानुसार त्यांच्या स्वयंपाकघरात पाश्‍चात्त्य पद्धतीची भांडी, वस्तूंचा समावेश होता. डायनिंग टेबल, खुर्च्या...’ हे शब्द तुमच्या कानातून मनामध्ये खोलवर रुजत जातानाच समोर प्रत्यक्षात दिसत असतात ती, बाबासाहेबांचा परिसस्पर्श झालेली भांडी, वस्तू, कपडे, व्हायोलिन व पुस्तकेही ! जणू काही त्याच वस्तू बाबासाहेबांचे जीवन व कार्याविषयी हितगूज करताहेत ! ही किमया साधली आहे, एका ‘ऑडिओ गाइड’ने !

सेनापती बापट रस्त्यावरील सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारकाला आठ महिन्यांपूर्वी अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या दैनंदिन वापरातील २८० वस्तू व ४९० पुस्तके या संग्रहालयामध्ये ठेवले आहेत. याबरोबरच काही महत्त्वाच्या घटनाप्रसंगांद्वारे त्यांच्या जीवनावर प्रकाशही टाकला आहे. त्यापैकी संग्रहालयाच्या मध्यवर्ती भागात ठेवलेल्या बाबासाहेबांच्या विविध वस्तू व घटनाप्रसंगांची माहिती ‘ऑडिओ-गाइड’ पर्यटकांना देते. पर्यटक काही क्षण बाबासाहेबांच्या त्या जीवनकार्यामध्ये हरवून जातात.

सर्व वस्तू व घटनाप्रसंगावर आधारित संगणकप्रणाली तयार केली आहे. त्यांचे अनुक्रमांक प्रत्येक ठिकाणी लावले आहेत. त्यानुसार टॅबवरील क्रमांकांना स्पर्श केल्यानंतर समोरील घटनेची माहिती नागरिकांना हेडफोनद्वारे ऐकायला मिळते. स्वयंपाकघरातील वस्तू, पुस्तके, भारतरत्न पदक, व्हायोलिन, घटना लिहिताना व सुपूर्त करताना वापरलेली खुर्ची, ट्रॅव्हलिंग किट, डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झालेला पलंग यांसारख्या असंख्य वस्तू व घटनांबाबत ‘ऑडिओ गाइड’कडून माहिती मिळते. संग्रहालयातील वस्तूंची ‘ऑडिओ गाइड’द्वारे माहिती देण्याचे तंत्रज्ञान पुण्यात याच संग्रहालयामध्ये पहिल्यांदा झाल्याचा दावा संग्रहालयाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार यांनी केला.

अतिशय साध्या-सोप्या पद्धतीने ‘ऑडिओ गाइड’द्वारे आपल्याला बाबासाहेबांच्या जीवनातील घटनाप्रसंग ऐकायला मिळतात. त्या वस्तूच आपल्याशी संवाद साधत आहेत, असे आपल्याला वाटते. सध्या मराठी व इंग्रजीतून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भविष्यात हिंदीतूनही सुरू करणार आहोत.
- संजीवनी मुजुमदार, मानद संचालिका,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय

Web Title: pune news Dr. babasaheb ambedkar Audio Guide