जेव्हा मोकळी होतात युवा मनं...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

भीतीमुक्त समाजाच्या दिशेने आपण सर्वांनीच पावलं टाकणं गरजेचं आहे. युवा वर्गाने आपल्या अभिव्यक्तीसाठी स्वतःच एक व्यासपीठ निर्मून तिथे रोज एकत्र येत भेटणं आवश्‍यक आहे. देशातलं सध्याचं वातावरण बदलायचं असेल तर, हे आवश्‍यक आहे. एकेकाळी गांधीजींनी सूत कातून स्वराज्य मिळवलं होतं. आता मात्र सुताची जागा संवादाने घेतली आहे, हे लक्षात ठेवा. कुठल्याही परिस्थितीत स्वतःचं स्वातंत्र्य सोडू नका. निर्भय समाजासाठी निर्भय तरुण आवश्‍यक आहेत.
- डॉ. गणेश देवी

पुणे: आम्हांला आमच्या कॅम्पसेस मध्ये मनमोकळं, दबावरहित वातावरण हवंय... "फियरलेस कॅम्पस' हे खरंच वास्तवात येऊ शकेल की, ते नुसतं एक स्वप्नंच ठरेल ?... शिक्षक विद्यार्थ्यांत मनाचं नातं जडावं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या शेजारी बसवून मैत्रीच्या भावनेतून एखादा विषय समजावून सांगावा. शिक्षक-विद्यार्थी असा दुरावा नाहीसा होत कॅम्पसेसचं एक मनमोकळं कुटुंबच होऊन जावं... असा अभिनव बदल खरंच घडू शकेल ?... जाती-धर्मांवरून होणाऱ्या "ट्रोलिंग'ला आम्हांला ठामपणे नाही म्हणायचंय- तुम्ही आहात आमच्या सोबत ?... असे कितीतरी प्रश्‍न व्यासपीठावरून मांडले जात होते अन युवा मनं डॉ. गणेश देवींपुढे मोकळी होत होती...

शब्दशः "मुक्त' म्हणावं असं एक संवादसत्र पुण्यात शुक्रवारी अनुभवायला मिळालं. या सत्रात व्यासपीठ तर होतं, पण कुणी प्रमुख पाहुणा नव्हता, कुणी अध्यक्ष नव्हता, ना कुणी "व्हीआयपी' यात आलं होतं. या सत्रात होते राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले दीड-दोनशे उत्साही आणि मनांत खूप काही साठवून आणलेले तरुण-तरुणी आणि त्यांचं सारं काही ऐकायला आपला वेळ आणि आपली इच्छा घेऊन आलेले प्रख्यात भाषासास्त्रज्ञ आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते डॉ. गणेश देवी.
"दक्षिणायन' या उपक्रमाचाच एक भाग म्हणून राज्यातील युवा स्पंदनं जाणून घेण्याच्या उद्देशाने देवींसोबत तरुण-तरुणीचं हे सत्र शुक्रवारी आयोजिण्यात आलं होतं. यात विद्यार्थी आपल्या मनातलं बोलून दाखवत होते. ज्याला वाटेल तो व्यासपीठावर येऊन मनातले विचार बोलत होता. कुणी आपले अनुभव सांगत होतं. कुणी महाविद्यालयांच्या कॅम्पसेस मधल्या राजकीय दबावावर मन मोकळं करत होतं. कुणी त्याला/तिला आलेल्या जातीय-धार्मिक "कमेन्ट्‌स'च्या अनुभवांना सर्वांपुढे मांडत होतं, तर कुणी अजून कुठल्या विषयावर. परस्परांच्या अनुभव अन विचार कथनाचा हा मेळा सुमारे तीन तास चालला.

डॉ. देवी यांनी यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. देशात बदल घडवून आणायचा असेल तर, विद्यार्थ्यांच्या पातळीवर काही ठोस पावलं उचलली जायला हवीत आणि त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी काही स्पष्ट कृतीकार्यक्रम पुढ्यात असावा, असं देवींनी मांडलं. विद्यार्थ्यांच्याच मतांमधून पुढे आलेले काही मुद्दे एकत्र बांधत त्यांनी त्यातून काही रचनात्मक घडवण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्याविषयी एक दिशा स्पष्ट केली. प्रश्न विचारू नये म्हणून भीती, स्वतंत्र विचार निर्माण न होऊ देण्यासाठी भीती, वेगळ्या वाटेच्या विचारांची भीती, या सगळ्यातून तरुणांनी बाहेर पडत उभं राहावं, असंही ते म्हणाले.

'ई सकाळ'वरील महत्वाच्या ताज्या बातम्या
बलात्काराचा आरोप करत जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमध्ये व्हॉटसऍपचे हॅकिंग; दक्षतेचे आवाहन
सामान्यांच्या जेवणात दिसू लागले वरण
वारीद्वारे केली अपंगत्वावर मात
परभणी: पत्नीची पेटवून घेऊन तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या
कल्याणमध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे; वाहतुकीची कोंडी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार
'बीफ' बाळगल्याच्या आरोपाखाली जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमधील सोनसाळखीची चोरी सीसीटीव्हीत कैद (Video)
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू

Web Title: pune news dr ganesh devi and youth