धर्मातील अनिष्ट चालीरीती संपविण्याचे प्रयत्न हवेत - डॉ आ. ह. साळुंखे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

पुणे - 'संमिश्र समाजाच्या या देशात अंतरिक ऐक्‍य राहिले नाही, तर सांगडा म्हणून देश एकसंध दिसत असला, तरी मनाने तो एकसंध राहणार नाही. धर्मातील अनिष्ट चालीरीती संपविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, मात्र ते करत असताना परस्परांचा आदर ठेवणे, संवाद ठेवणे आवश्‍यक आहे,'' असे मत प्राच्यविद्यापंडित डॉ आ. ह. साळुंखे यांनी रविवारी व्यक्त केले.

पुणे - 'संमिश्र समाजाच्या या देशात अंतरिक ऐक्‍य राहिले नाही, तर सांगडा म्हणून देश एकसंध दिसत असला, तरी मनाने तो एकसंध राहणार नाही. धर्मातील अनिष्ट चालीरीती संपविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, मात्र ते करत असताना परस्परांचा आदर ठेवणे, संवाद ठेवणे आवश्‍यक आहे,'' असे मत प्राच्यविद्यापंडित डॉ आ. ह. साळुंखे यांनी रविवारी व्यक्त केले.

"डॉ आ. ह. साळुंखे अमृतमहोत्सवी गौरव समिती' आणि "अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती' यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आ. ह. साळुंखे यांची ग्रंथतुला करण्यात आली; तसेच मानपत्र, फुले पगडी आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना साळुंखे यांनी आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे, औरंगाबाद माजी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, शिवमहोत्सव समितीचे विकास पासलकर, उदयसिंह माहुरकर, सविता मनोहर, प्रदीप शिर्के, कमलजित महाले, शिवाजीराव जोंधळे, संजय कल्याण आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आ. ह. साळुंखे यांच्या जीवनकार्यावरील माहितीपटाचे अनावरण करण्यात आले.

डॉ. साळुंखे म्हणाले, 'जातींपेक्षा माणूस किती उच्च कोटीचा आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. परिर्वतन लगेच होत नाही. परिवर्तनाच्या चळवळीत चांगला कार्यकर्त्या होण्यासाठी चांगला माणूस बनणे ही पूर्वअट आहे. माणसालादेखील चांगला पवित्रा घेण्यासाठी वेळ लागतो. तसे परिवर्तन होण्यासही वेळ लागतो. इतिहासाची मांडणी वेगळ्या पद्धतीने झाली आहे. तिचे पुनर्लेखन न्याय व समातोल पद्धतीने केले पाहिजे. सैलपणे लेखन करून चालणार नाही. खोट्याला खोटापणाने उत्तर दिले तर त्यातून आपली संस्कृती उजळणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.''

पवार म्हणाले, 'शेतकरी कुटुंबात जन्म, शैक्षणिक पार्श्वभूमी नाही, मात्र उभ्या आयुष्यात साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान पाहता त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे, अशी भावना मनात येते. साळुंखे यांचा प्रत्येक ग्रंथ हा विचारप्रवर्तक आहे. समाजातील जो दुर्लक्षित घटक आहे, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

स्त्रियांच्या स्थानाबद्दलचे परखड लिखाण, शेती क्षेत्र, तुकारामांचा सखोल अभ्यास, त्यांची विद्रोही विचार मांडण्याची भूमिका वैदिक पारंपरेला विरोध आणि बहुजनांची गुलामगिरीतून मुक्तता हे त्यांच्या लिखाणाचे सूत्र आहे.''

'बहुजन जागृतीची ज्योत पेटविणारे अनेक महापुरुष होऊ गेले. 21व्या शतकात कोणाचे नाव घ्यायचे असेल तर ते आ. ह. साळुंखे यांचे नाव घ्यावे लागेल,'' असे भाई वैद्य म्हणाले.

Web Title: pune news dr a h salunkhe talking