पुणे "प्रकाश' प्रदूषणाच्या छायेखाली 

पुणे "प्रकाश' प्रदूषणाच्या छायेखाली 

पुणे - ""पूर्वीच्या आणि सध्याच्या पुणे शहरात खूप बदल झाला आहे. शहर व उपनगरांमध्ये कमालीचा फरक पडला आहे. आपले शहर सध्या "प्रकाश' प्रदूषणाच्या छायेखाली वावरत आहे. आकाश निरीक्षणासाठी शहरापासून लांब जावे लागते. कारण, त्या वेळी प्रकाश नको असतो,'' असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी रविवारी व्यक्त केले. 

ऍड-व्हेंचर फाउंडेशन या संस्थेतर्फे बारावा "मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार' ज्येष्ठ खगोलशास्त्र अभ्यासक डॉ. प्रकाश तुपे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी वनमहर्षी मारुती चितमपल्ली आवर्जून उपस्थित होते. 

डॉ. नारळीकर म्हणाले, ""हडपसरला शेतात राहताना तुपे यांना आकाशदर्शनाची गोडी लागली. एकदा उल्कावर्षाव दिसणार आहे, असे कळल्यावर तुपे यांच्या विनंतीवरून मी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना "रात्रीच्या वेळी शहरातील वीज काही काळ बंद ठेवावी' असे पत्र लिहिले. त्यावर सुरक्षेच्या कारणास्तव असे करता येणार नाही, अशी दिलगिरी व्यक्त करणारे उत्तर त्यांच्याकडून मिळाले.'' 

डॉ. तुपे म्हणाले, ""डॉ. जयंत नारळीकर, डॉ. राम ताकवले, मारुती चितमपल्ली यांसारख्या दिग्गजांचा सहवास मला लाभला. तोंड बंद ठेवले आणि डोळे, कान उघडे ठेवल्यास जंगल कळते, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. आकाशात भिरभिरणारी नजर खाली आल्यामुळे जंगल जाणून घेता आले.'' 

डॉ. ताकवले म्हणाले, ""पृथ्वी आणि अवकाशाशिवाय पर्यावरण असूच शकत नाही. भारतीय संशोधनपद्धती ग्रीकांपेक्षा वेगळी आहे. ग्रीक संशोधनात तत्त्वज्ञानाच्या आधारे सिद्धांत मांडले गेले. भारतीयांनी ग्रह-ताऱ्यांचे निरीक्षण केले, आकृती काढल्या आणि सांख्यिकीच्या आधारे निसर्गनियम शोधून काढले. भारतीय विज्ञानाचा हा आदर्श दृष्टिकोन जगभरात उपयोगात आणला जातो.'' 

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. तुपे यांचे "आकाशातील अद्‌भुत विश्‍व' याविषयावर सादरीकरण झाले. प्रास्ताविक विवेक देशपांडे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रशांत कोठडिया यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com