'सोवळे' मोडल्याप्रकरणी आरोप-प्रत्यारोप, निषेध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

डॉ. मेधा खोले यांच्या तक्रारीवर प्रतिक्रिया

डॉ. मेधा खोले यांच्या तक्रारीवर प्रतिक्रिया
पुणे - 'सोवळे' मोडल्याच्या कारणावरून स्वयंपाक करणाऱ्या महिलेविरुद्ध हवामानशास्त्र विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी युवती संघटनेने खोले यांचा निषेध केला, तर "डॉ. खोले आणि निर्मला यादव यांचा हा आपसांतील वैयक्तिक वाद असून, त्यांनी तो सामोपचाराने मिटवावा', अशी भूमिका अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मांडली.

निर्मला यादव यांनी जात लपवली, तसेच सुवासिनी असल्याचे सांगून आपल्या घरी स्वयंपाकाचे काम केल्याची तक्रार खोले यांनी केली, तर खोले यांनीच आपल्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची फिर्याद यादव यांनी दिली. खोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घरी दरवर्षी गौरी- गणपती आणि त्यांच्या आई- वडिलांचा श्राद्धविधी असतो.

त्यासाठी आपल्याला सुवासिनी आणि ब्राह्मण महिलेची आवश्‍यकता होती. निर्मला यादव (वय 60, रा. धायरी) यांनी "आपले नाव निर्मला कुलकर्णी आहे' असे सांगून, घरी सोवळ्याच्या स्वयंपाकाचे काम केले. त्या ब्राह्मण नसल्याचे जोशी नावाच्या एका गुरुजींकडून आपल्याला समजले. याचा जाब विचारण्यासाठी आपण धायरी येथील यादव यांच्या घरी गेलो. त्या वेळी यादव यांनी अंगावर धावून येत आपल्याला शिवीगाळ केली.

यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खोले घराबाहेर आल्यावर त्यांनी "विदुला जोशी आल्या आहेत', असा निरोप दिला. घरात आल्यानंतर त्यांनी आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ -
शहरात अशा प्रकारचा गुन्हा दाखल होणे दुर्दैवी आहे. सोवळ्याचा संबंध शुचिर्भूतता आणि स्वच्छता याच्याशी असून, जातीशी काही संबंध नाही. ज्येष्ठ महिलेवर दाखल गुन्ह्याबाबत त्यांच्या वयाचा विचार करून खोले यांनी तक्रार मागे घ्यावी. दरम्यान, काही संघटना आणि राजकारणी या प्रकरणाला जातीयवादाचा रंग देत आहेत, असा आरोप करीत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी हा वाद निर्माण करणाऱ्यांचा निषेध व्यक्‍त केला.

संभाजी ब्रिगेड
शासकीय अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी सरकारने डॉ. मेधा खोले यांना निलंबित करावे; तसेच त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवणे आणि सामाजिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने पोलिस आयुक्‍तांकडे केली.

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस
अंधश्रद्धेला खतपाणी घालून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डॉ. खोले यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसने त्यांच्या निवासस्थानासमोर आज निदर्शने केली. समाजात वाद निर्माण करणे, जातीय संघर्ष निर्माण करणे हे चुकीचे आहे. ज्येष्ठ महिलेवरील गुन्हा सामोपचाराने मागे घ्यावा, तसेच या प्रकरणाला जातीय रंग दिला जाऊ नये, असे आवाहन युवती कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष मनाली भिलारे यांनी केले.

Web Title: pune news dr medha khole controversy nirmala yadav