भावनांची ओळख करून देणं महत्त्वाचे - डॉ. मोहन आगाशे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

पुणे - ""मानसशास्त्रात भावना उद्दिपित न करता भावनांची ओळख करून देणे महत्त्वाचे असते. परंतु दुर्दैवाने आपली शिक्षण पद्धती पुस्तकांवर अवलंबून असल्यामुळे भावनांची ओळख कशी करून द्यायची हेच शिकविले जात नाही. त्यामुळे भावनांची ओळख करून घेण्यासाठी आणि देण्यासाठी विशेष मेहनत घेण्याची गरज आहे,'' असे मत ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले. 

रोहन प्रकाशनच्या वतीने डॉ. लिली जोशी लिखित "तुमच्या आमच्या लेकी, त्यांचं आरोग्य...त्यांच्या समस्या' पुस्तकाचे प्रकाशन लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. आगाशे बोलत होते. या वेळी नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे, समुपदेशक वंदना सुधीर कुलकर्णी, प्रकाशनाचे प्रदीप चंपानेरकर उपस्थित होते. डॉ. आगाशे म्हणाले, ""डॉक्‍टरांच्या संवेदनक्षम मनाला नेहमीच तटस्थपणे पाहावे लागते. परंतु यामुळे अनेकदा साचलेपणा येण्याची शक्‍यता असते.'' अभिनय आणि भावना यांची सांगड घालत ते म्हणाले, ""लेखकाने लिहिलेल्या संवादातून न लिहिलेल्या भावना अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याचे कसब अभिनेत्यात असावे लागते.'' 

गोडबोले म्हणाल्या, ""आजच्या पिढीत तरुण एकाचवेळी कुटुंबाची जबाबदारी, करिअर, पैसा, व्यक्तिमत्त्व विकास, अशी अनेक गोष्टींसाठी "मल्टीटास्किंग' करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु प्रत्येक हे करण्याची क्षमता असेलच असे काही नाही. "मल्टीटास्किंग' न जमल्यामुळे नैराश्‍य येत असून, मानसिक ताण वाढत आहे. काळाच्या छोट्या तुकड्यात खूप गोष्टी कोंबण्याच्या या प्रयत्नांमुळे त्या त्या वयातील असंख्य आनंदी क्षणापासून ही पिढी दूर राहत आहेत.'' कुलकर्णी म्हणाल्या, ""दमछाक करणाऱ्या जीवन पद्धतीमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कामाच्या ताणामुळे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.'' 

प्रकाशित झालेल्या पुस्तकातील निवडक भाग पेठे यांनी या वेळी वाचून दाखवला. नीता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: pune news Dr. Mohan Agashe