'नुसत्या प्रमाणपत्राने नोकरी मिळत नाही'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पुणे - ‘‘केवळ प्रमाणपत्र मिळाले म्हणून नोकरी मिळते असे नाही. त्यासाठी वेगवेगळ्या कौशल्यांचीही आवश्‍यकता असते. तसे शिक्षण मिळाले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षण क्षेत्रात बदलही होऊ लागले आहेत,’’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बुधवारी व्यक्त केले.

पुणे - ‘‘केवळ प्रमाणपत्र मिळाले म्हणून नोकरी मिळते असे नाही. त्यासाठी वेगवेगळ्या कौशल्यांचीही आवश्‍यकता असते. तसे शिक्षण मिळाले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षण क्षेत्रात बदलही होऊ लागले आहेत,’’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बुधवारी व्यक्त केले.

जागतिक मराठी अकादमी आणि भारत विकास ग्रुपतर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक संमेलनाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, माजी खासदार यशवंतराव गडाख, संमेलनाचे स्वागताध्यक्ष हणमंतराव गायकवाड, उद्योजक केसरी पाटील, अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, संयोजक सचिन इटकर उपस्थित होते.

फुटाणे म्हणाले, ‘‘जगण्याच्या दोन-तीन वाटा असल्या पाहिजेत. विद्यापीठातून मिळणाऱ्या प्रमाणपत्रांवरच अवलंबून राहू नये. हे मी अनुभवातून सांगत आहे.’’ हाच धागा पकडत डॉ. करमळकर यांनी बदलत्या शिक्षणपद्धतीवर भाष्य केले. शिवाय, विद्यार्थ्यांनी अधिकाधिक कौशल्य प्राप्त करण्यावर भर द्यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्याने नेहमीच विविध क्षेत्रांत आपले योगदान दिले आहे. कोणत्याही क्षेत्रात यश मिळण्यासाठी आपल्यासमोर आदर्श असण्याची गरज असते. या संमेलनाने अशा आदर्श व्यक्तिमत्त्वाची फळीच आपल्यापुढे सादर केली, असेही त्यांनी सांगितले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.

शरद पवार यांची मुलाखत रद्द
शोध मराठी मनाचा या संमेलनात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे घेणार असलेली मुलाखत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या तणावपूर्ण वातावरणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे रामदास फुटाणे यांनी जाहीर केले. पवार आणि ठाकरे हे दोन दिग्गज नेते एका व्यासपीठावर येत असल्याने या मुलाखतीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. याआधी संसदेतील कामकाजामुळे ३ जानेवारीची मुलाखत ६ जानेवारीला घेण्यात येणार, असे जाहीर केले होते. आता ६ जानेवारीचीही मुलाखत पुढे ढकलली आहे.

Web Title: pune news Dr. Nitin Karmalkar service education certificate