पुण्याच्या डॉ. परेश काळे यांना ‘डिप्लोमेट’बहुमान

सॅन डिएगो, अमेरिका - डॉ. परेश काळे यांना ‘डिप्लोमेट’ प्रमाणपत्र देऊन गौरविताना ‘अमेरिकन बोर्ड ऑफ ओरल इम्प्लांटॉलॉजी’चे अध्यक्ष आर्थर मोझलान.
सॅन डिएगो, अमेरिका - डॉ. परेश काळे यांना ‘डिप्लोमेट’ प्रमाणपत्र देऊन गौरविताना ‘अमेरिकन बोर्ड ऑफ ओरल इम्प्लांटॉलॉजी’चे अध्यक्ष आर्थर मोझलान.

पुणे - दंतवैद्यक शास्त्रातील ‘इम्प्लांट डेन्टिस्ट्री’ ही उपचार पद्धती दिवसेंदिवस विकसित होत आहे. या पद्धतीबद्दल अमेरिकन बोर्ड ऑफ ओरल इम्प्लांटॉलॉजी या संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘डिप्लोमेट’ हा बहुमान पुण्याचे दंतशल्यचिकित्सक डॉ. परेश काळे यांना मिळाला आहे. हा बहुमान मिळविणारे काळे हे पहिले भारतीय डॉक्‍टर ठरले आहेत.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन डिएगो शहरात झालेल्या समारंभात अमेरिकन बोर्ड ऑफ ओरल इम्प्लांटॉलॉजीचे (एबीओआय)अध्यक्ष आर्थर मोझलान यांच्या हस्ते डॉ. काळे यांना सन्मानित करण्यात आले. ‘एबीओआय’तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेला जगभरातून ६५ डॉक्‍टर बसले होते. त्यापैकी ३९ डॉक्‍टर उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये अमेरिकेव्यतिरिक्त जपान, दक्षिण कोरिया आणि भारत या तीनच देशांतील डॉक्‍टरांना हा गौरव प्राप्त झाला. त्यात डॉ. काळे यांचा समावेश असून, गेली अनेक वर्षे ते दंतशल्यचिकित्सक म्हणून प्रॅक्‍टिस करीत आहेत.

‘फेलो ऑफ अमेरिकन असोसिएशन ऑफ इम्प्लांट डेन्टिस्ट्री’ ही पदवीही डॉ. काळे यांना यापूर्वी प्राप्त झाली आहे. ‘डिप्लोमेट’ बहुमान मिळविण्याकरिता तोंडी परीक्षा द्यावी लागते. दंतशल्यचिकित्सक म्हणून आजवर केलेल्या सेवेचे मूल्यमापन होते. ‘इम्प्लांट डेन्टिस्ट्री’मध्ये (जबड्यामध्ये स्क्रू बसवून दात बसविणे) चारशे तासांचा अनुभवही असावा लागतो, तरच ही परीक्षा देता येते. ‘इम्प्लांट डेन्टिस्ट्री’ पद्धतीद्वारे किती रुग्णांवर उपचार केले. यासंबंधीचे दाखलेही ‘एबीओआय’कडे सादर करावे लागतात. या सर्व निकषांनुसार डॉ. काळे यांनी परीक्षा दिल्यावर त्यांना ‘डिप्लोमेट’ हा बहुमान मिळाला आहे.

दंतवैद्यक शास्त्रातील योगदानाबद्दल डॉ. काळे यांना सॅन डिएगो येथे संस्थेच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात व्याख्यान देण्याकरिता आमंत्रित केले होते. बॅंकॉक, सिंगापूर, हाँगकाँग, वॉशिंग्टन, मिलान, म्युनिक, कोलंबो, न्यूजर्सी या ठिकाणीही त्यांची व्याख्याने झाली. लवासा येथे २०११ मध्ये भरलेल्या देशपातळीवरील डेंटल इम्प्लांटॉलॉजी अधिवेशनाचे चिटणीसपदही त्यांनी भूषविले होते. सध्या ते इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्प्लांटॉलॉजी या संस्थेचे सचिव आहेत. पदव्युत्तर शिक्षणानंतर इम्प्लांटॉलॉजी या विषयावर डॉक्‍टरांना प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ डेन्टिस्ट्री येथे डॉ. दीपक कुलकर्णी यांनी डॉ. काळे यांच्या सहकार्याने इम्प्लांटॉलॉजी वरचा एक वर्षाचा अभ्यासक्रमही सुरू केला आहे.

रुग्णाचे आरोग्य सुधारावे. या दृष्टीने ‘इम्प्लांट डेन्टिस्ट्री’ ही उपचार पद्धती उपयुक्त आहे. भारतातही या पद्धतीचा प्रसार व प्रचार होण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न राहतील.
- डॉ. परेश काळे, दंतशल्यचिकित्सक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com