दरडींच्या कोसळण्यावर दीर्घकालीन उपाययोजनांची गरज - डॉ. सतीश ठिगळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

पुणे - सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. यातून मार्ग काढण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना होणे गरजेचे आहे. या घाटरस्त्याचे रुंदीकरण करावे, दरड कोसळण्याची शक्‍यता असणाऱ्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी, धोकादायक भागात पाण्याचा निचरा त्वरेने होण्यासाठी पावले उचलावीत, असा सल्ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश ठिगळे यांनी दिला.

सिंहगड घाटात नुकतीच दरड कोसळली. सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली. या पार्श्‍वभूमीवर दरड कोसळण्याची कारणे आणि उपाययोजना याविषयी "सकाळ'ने घेतलेल्या आठवड्याच्या मुलाखतीत डॉ. ठिगळे बोलत होते.

ते म्हणाले, 'दरड कोसळण्याची शक्‍यता असलेल्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावाव्यात, तसेच सह्याद्री घाटातील अशाच अन्य रस्त्यांवर संरक्षक भिंतीही उभारण्यात याव्यात. धोकादायक भागात पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी उपाययोजना करावी. सिंहगडच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. तसेच, धोक्‍याच्या जागी गेलेले तडे आणि चिरा यांचा सखोल अभ्यास करून तेथे पायऱ्यासदृश टप्पे तयार केल्यास डोंगर उताराची तीव्रता कमी होईल. यातून या संकटावर मात करता येईल.''

सिंहगड समुद्र सपाटीपासून सुमारे 1200 मीटर उंचीवर असून, पायथ्यापासून त्याची उंची 580 मीटर आहे. येथील रस्ता बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाच्या एकूण 23 स्तरांतून जातो. भूपृष्ठांतर्गत हालचालींमुळे या स्तरांना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यावर तापमान, आर्द्रता, पर्जन्यवृष्टी इत्यादीचा परिणाम होतो. त्यातून खडकाचे लहान- मोठे सुळके वेगळे होऊ लागतात. पावसाळ्यात या सुळक्‍यांचा आधार तुटतो आणि दरडी कोसळण्यास सुरवात होते. अतिवृष्टीत या चिरांमध्ये पाणी जाऊन दरडी कोसळण्याची शक्‍यता अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरड कोसळण्याची नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशी दोन प्रकारची कारणे असतात, असे सांगत डॉ. ठिगळे म्हणाले, ""पर्वतमय प्रदेश, भूशास्त्रीय परिस्थिती आणि अतिवृष्टी ही दरड कोसळण्याची प्रमुख कारणे आहेत. महाराष्ट्राचा विचार केला, तर सह्याद्रीचा परिसर ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाला आहे. समुद्रकिनाऱ्यापासून ते महाबळेश्‍वरपर्यंत थरावर थर असे एकूण 32 थर आहेत. त्याची रचना पश्‍चिमेकडे कडा, कोकण सपाट आहे. आजही सह्याद्रीच्या परिसरात अधून-मधून भूकंपाचे धक्के बसत आहेत. तसेच, पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे भूपृष्ठाचे वजन वाढल्यामुळे डोंगरउतारांना तडे जातात. या दोन्ही कारणांमुळे डोंगराला पडणाऱ्या तड्यांमध्ये पावसाचे पाणी मुरते आणि जमीन हळूहळू खचू लागते, ही नैसर्गिक कारणे म्हणता येतील.'' दरडी अचानक कोसळत नाहीत, ती कोसळण्याची शक्‍यता दर्शविणाऱ्या अनेक पूर्वसूचना असतात; फक्त त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वन विभाग, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा संबंधित विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे दरड कोसळ्यास प्रतिबंधात्मक उपाय प्रत्यक्षात आणण्यास अडचणी येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन नियोजन यंत्रणेचे अस्तित्व फारसे दिसत नाही. तसेच, यासाठी मनुष्यबळाचाही अभाव असल्याचे त्यांनी सांगितले.

दरड कोसळण्यापूर्वीची लक्षणे :
- डोंगरउतारांना तडे जाणे आणि भूभाग खचणे
- घरांच्या भिंतींना भेगा पडणे, पडझड होणे, झाडे किंवा विजेचे खांब उताराकडे कलणे
- झरे रुंदावणे, त्यातून मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी बाहेर पडणे

दरड कोसळण्याचे प्रकार न होण्यासाठी उपाय :
- डोंगराजवळील गावठाणांचा आणि वाड्यांचा विस्तार न करणे
- डोंगरउतारांचे सपाटीकरण टाळणे, चर न खणणे
- डोंगर पायथ्याशी झऱ्यांच्या क्षेत्रात बदल न करणे

हा मजकूर जागेनुसार घ्यावा
* दरड कोसळण्याच्या मागील काही घटना
- माळीण (ता. आंबेगाव, पुणे) 30 जुलै 2014; 150 नागरिकांचा मृत्यू; गाव जमिनीखाली गाडले गेले
- जुई (ता. महाड, रायगड) 3 जुलै 2005; 90 जणांचा मृत्यू
- भाजे (ता. मावळ, पुणे) 24 जुलै 1989; झऱ्यातून चिखलमिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात पडू लागले आणि काही वेळातच दरड कोसळली; 40 नागरिकांनी गमावला जीव
- कोयना भूकंपात (11 डिसेंबर 1967) रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील डोंगरांना तडे पडले, नेमक्‍या त्याच ठिकाणी जून 1983मध्ये अतिवृष्टीमध्ये 56 ठिकाणी दरडी कोसळल्या

Web Title: pune news dr. satish thigale interview