संमेलनाध्यक्षासाठी लेखिकांकडे वेळ कुठंय?

मंगळवार, 25 जुलै 2017

पुणे - ‘‘संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी आधी स्वतःकडे भरपूर ‘रिकामा वेळ’ असावा लागतो. इतका वेळ आजच्या लेखिकांकडे कुठं आहे? जेवढा वेळ मिळतो तेवढा सर्जक कामात खर्च करावा, ही वृत्ती जवळपास सर्वच लेखिकांमध्ये असल्याने त्या या निवडणुकीपासून दूर राहतात,’’ असे स्पष्ट मत लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले. साहित्यक्षेत्रात अनुल्लेखातून लेखिकांचे दुय्यम स्थान दाखवले जाते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

एकीकडे आगामी साहित्य संमेलनाचे स्थळ ठरवण्याची लगबग सध्या सुरू आहे, तर दुसरीकडे ‘आम्ही सांगू तो संमेलनाध्यक्ष झाला पाहिजे’, असे ‘लॉबिंग’ही साहित्य संस्थांच्या वर्तुळात आत्तापासूनच सुरू झाले आहे; पण संमेलनाच्या आजवरच्या ९० वर्षांच्या इतिहासात केवळ चारच लेखिकांना अध्यक्षपद मिळाले आहे. अलीकडच्या काळात तर लेखिकांना संमेलनाचे अध्यक्षपद मिळालेच नाही आणि त्या निवडणुकीच्या रिंगणातही उतरताना दिसत नाहीत. या सर्व मुद्यांवर भवाळकर यांनी ‘सकाळ’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. एका कार्यक्रमानिमित्त त्या नुकत्याच पुण्यात आल्या होत्या.

भवाळकर म्हणाल्या, ‘‘निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी रिकामा वेळ, त्यापाठोपाठ शक्ती आणि भरपूर पैसा असावा लागतो. वादात अडकण्याची तयारी असावी लागते. त्यात स्त्रियांना बदनाम करणे आणखीनच सोपे असते. या सर्व गोष्टींचा लेखिका विचार करतात. त्यात अर्ज करणे ही प्रवृत्ती लेखिकांमध्ये नाही. शिवाय, संमेलनाच्या अध्यक्षपदामुळे प्रतिष्ठा मिळते, असेही लेखिकांना वाटत नाही.’’

संमेलनाध्यक्षपदासाठी तुमचे नाव सातत्याने चर्चेत असते, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘‘मी आजपर्यंत अर्ज करून काहीही मिळवले नाही. मग ते पुरस्कार असतील किंवा वेगवेगळ्या संमेलनाचे अध्यक्षपद. जे सन्मानाने मिळते ते आपले असते. त्यातच खरा संतोष असतो, अशी माझी भूमिका आहे.’’ आपल्याकडे बरीच संमेलने होतात. अगदी जागतिक संमेलनेसुद्धा होतात. या सर्वांचे अध्यक्षपद सन्मानाने दिले जाते. मग इथेच (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) निवडणुकीचा अट्टहास कशाला, असा सवाल उपस्थित करत दुर्गाबाईंना हे पद सन्मानाने मिळाले होते. त्यांनी अर्जही केला नव्हता, याकडेही त्यांनी लक्ष वेधून घेतले.

आपल्याकडील पुरुषबांधवांपेक्षा सरस लेखन स्त्रिया करत आहेत, अगदी पूर्वीपासून; पण त्यांना आजही अनुल्लेखाने मारले जात आहे. त्यात लेखिकांना पुरेशी प्रसिद्धीही मिळत नाही आणि ती मिळवावी, अशी प्रवृत्तीही लेखिकांमध्ये नाही.
- डॉ. तारा भवाळकर, लोकसाहित्याच्या अभ्यासक

Web Title: pune news Dr. Tara Bhawalkar