नाले-ओढे तुंबले !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

पुणे - आधीच अतिक्रमणांनी अरुंद झालेले ओढे, नाले आणि त्यात भलेमोठे कचऱ्याचे ढीग, बांधकामांचा राडारोडा, साचलेला गाळ, तुटलेले चेंबर, मोडकळीस आलेल्या सीमाभिंती आणि मृत अवस्थेतील प्राणी. हे दृश्‍य आहे शहराच्या लोकवस्तीतून वाहणाऱ्या ओढ्या-नाल्यांचे. ‘सकाळ’ने आज केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली.

पुणे - आधीच अतिक्रमणांनी अरुंद झालेले ओढे, नाले आणि त्यात भलेमोठे कचऱ्याचे ढीग, बांधकामांचा राडारोडा, साचलेला गाळ, तुटलेले चेंबर, मोडकळीस आलेल्या सीमाभिंती आणि मृत अवस्थेतील प्राणी. हे दृश्‍य आहे शहराच्या लोकवस्तीतून वाहणाऱ्या ओढ्या-नाल्यांचे. ‘सकाळ’ने आज केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली.

नाल्यांची वर्षानुवर्षे दर्जेदार कामे झाली नसल्याने त्यालगतची जमीन धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नाल्यालगतच्या रहिवाशांना पावसाळ्यात धोका निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शहरात सोमवारी झालेल्या पहिल्या पावसात ओढे, नाले तुंबून त्या-त्या भागात पाणी रस्त्यावर साचले, तर काहींच्या घरांमध्ये गेले.

नाल्यांमधील पाणी रस्त्यांवरही आले. या पार्श्‍वभूमीवर विविध भागांतील नाल्यांची प्रातिनिधीक स्वरुपात पाहणी करण्यात आली. 

एकेकाळी मोकळेपणाने वाहणाऱ्या अंबिल ओढ्याची स्थिती, तर एका कचरा डेपोसारखी झाली आहे. या ओढ्यात, जागोजागी कचरा पडलेला आहे.

प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी ओढा रंगीबेरंगी झाला आहे. गाळाच्या थरांमुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबत असून, जागा मिळेल तेथून ते वळत असल्याचे दिसून आले. नाल्यांतील सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांच्या झाकणांना भगदाडे पडली आहेत. 

एरंडवण्यातील गांधी लॉन परिसरातील नाल्यात प्रचंड गाळ असल्याने पाणी वाहून जाताना त्याला अडथळा होत असल्याचे दिसून आले. सीमाभिंती मोडकळीस आल्या असून, तेथील चेंबरची झाकणे पूर्णपणे तुटलेली आहेत.

या नाल्याची देखभाल-दुरुस्ती झालेली नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. दत्तवाडीतील नाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधून वाहत असल्याची स्थिती पाहणीत आढळून आली.

कोरेगाव पार्क आणि मुंढव्यातील नाले, ओढे अतिक्रमणांमध्ये गायब झाले आहेत. मुंढव्यातील एका नाल्यालगत सुमारे शंभरहून अधिक झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. या झोपड्या नाल्यापासून जेमतेम पाचशे आठ फुटांच्या अंतरावर आहेत. त्यामुळे नाल्याची रुंदी निम्मीच झाल्याचे सांगण्यात आले. या नाल्यातील कचरा वर्षभरात एकदाही काढला नसल्याची तक्रार आहे. लोहगाव परिसरातील साधारणत: तीन ते साडेतीन किलोमीटर लांबीचा नाला गायब झाला असून, मूळ नाला वळविण्यात आला आहे.

शंभर कोटीत कोणती कामे झाली ? 
गेल्या दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया राबवून दोन ठेकेदारांच्या माध्यमातून ओढे, नाल्यांची देखभाल-दुरुस्ती केल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत आहे. मात्र, दावा निवळ धूळफेक असल्याचे पाहणीत आढळले. अनेक ओढे आणि नाल्यांच्या कामांना हातही लावला नाही.मग, शंभर कोटी रुपयांच्या निधीतून नेमकी कोणती आणि काय कामे झाली, असा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

अहवालाबाबत कार्यवाही नाही 
शहरात दोन वर्षांपूर्वी झालेल्या अवेळी पावसामुळे ओढे, नाले आणि पावसाळी गटारांचा मुद्दा चर्चेत आला होता. शहराचा विस्तार लक्षा घेता, पावसाचे पाणी वाहून नेणारी यंत्रणा फारच तोकडी असल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. या पार्श्‍वभूमीवर पावसाळी गटारे बांधण्याबाबत पाहणी करून स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले होते. गेल्या दोन वर्षांत त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तसेच, सध्या अस्तित्वात असलेल्या पाचशे किलोमीटर लांबीच्या पावसाळी गटारांपैकी जेमतेम ५० किलोमीटर लांबीच्या गटारांची दुरुस्ती झाली नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: pune news Drain and tumble!