पहिल्याच पावसात नाले, गटारे तुंबली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

दुरुस्ती वेगाने सुरू असल्याचा महापालिकेचा दावा फोल 
पुणे - पावसाळ्याआधी ओढे, नाले आणि पावसाळी गटारांची सफाई, दुरुस्ती वेगाने करण्यात येत असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. शहरात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे नाले आणि गटारे तुंबल्याचे आढळून आले. नाल्यांमधील कचराही जागेवर असल्याचे अंबिल ओढा आणि नागझरी नाल्यातील परिस्थितीवरून दिसून आले आहे. उपनगरांमधील बहुतांशी नाल्यांच्या कामांना अजूनही हात लावलेला नसल्याने ऐन पावसाळ्यात धोकादायक परिस्थिती ओढविण्याची भीती आहे. 

शहर आणि आजूबाजूच्या परिसरात सुमारे पाचशे किलोमीटर लांबीची पावसाळी गटारे आहेत. तर, साडेतीनशे किलोमीटरचे नाले आहेत. त्यातील नैसर्गिक ओढे-नाले वळविण्यात आले असून, त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे अशा नाल्यांमध्ये राडारोडा आणि कचरा पडला आहे. अतिक्रमणांमुळे या नाल्यांची वर्षानुवर्षे देखभाल-दुरुस्ती काय तर सफाईही झालेली नाही. त्यामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडत आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात ओढे, नाले आणि पावसाळी गटारांची कामे अपेक्षित असतात. त्यात ‘कल्व्हर्टस्‌’ बांधणे, पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी वाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे केली जातात. तसेच, ज्या भागातील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असतो, त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे नियोजन केले जाते. अशा कामांकरिता सुमारे ९८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळा तोंडावर आल्याने नालेसफाईची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना महापौर मुक्‍ता टिळक यांनी महापालिका प्रशासनाला केली होती. ही मुदत संपली तरी अनेक भागातील नाल्यांची दुरवस्था असल्याचे पाहणीतून आढळून आले आहे. 

दुसरीकडे, महापौरांच्या सूचनेनंतर ओढे, नाल्यांची सफाई करण्यात येत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला; परंतु पावसाला सुरवात झाली तरी ही कामे वेगाने होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘पावसाला सुरवात झालेल्या सर्व भागातील नाल्यांची पाहणी करून तातडीने कामे करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार काही भागात कामे झाली आहेत, तर काही नाल्यांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. नाले आणि ओढ्यांच्या दुरवस्थेमुळे लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरणार नाही, यासाठी उपाययोजना केल्या आहेत. पुढील काळातही सफाईची कामे सुरू राहतील.’’

मुदत नावापुरतीच
रस्त्यांच्या दुरुस्तीसह ओढे, नाले आणि पावसाळी गटारांची दरवर्षी मे महिन्यात सफाईची कामे करणे अपेक्षित आहे. त्यानुसार ३१ मे पर्यंत ही कामे आटोपण्याची सूचना महापौरांनी महापालिका प्रशासनाला केली होती. तसेच, या कामांसाठी पुरेसा निधी वेळेत मंजूर करून घेतला जातो. मात्र, कामे वेळेवर होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे नालेसफाईची मुदत नावापुरतीच राहते. शिवाय, या कामांसाठी दरवर्षी तेच ठेकेदार नेमले जात असल्याच्याही तक्रारी येत आहेत.

Web Title: pune news dranage block in first rain