पाहणीचा सोपस्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

पुणे - आठवडाभरात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे असतानाही महापालिका प्रशासन ओढे- नाले आणि पावसाळी गटारांच्या पाहणीचा सोपस्कार करण्यात धन्यता मानत आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पथकाने बुधवारी दिवसभरात शहराच्या विविध भागातील, विशेषतः लोकवस्त्यांमधील ओढे, नाल्यांची पाहणी करण्यात आली असून या पाहणीतून नाले तुंबण्याची नेमकी कारणे हाती लागलेलीच नाहीत.

पुणे - आठवडाभरात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे असतानाही महापालिका प्रशासन ओढे- नाले आणि पावसाळी गटारांच्या पाहणीचा सोपस्कार करण्यात धन्यता मानत आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पथकाने बुधवारी दिवसभरात शहराच्या विविध भागातील, विशेषतः लोकवस्त्यांमधील ओढे, नाल्यांची पाहणी करण्यात आली असून या पाहणीतून नाले तुंबण्याची नेमकी कारणे हाती लागलेलीच नाहीत.

केवळ कचरा अडकल्याने ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्यक्षात ओढे, नाल्यांची दुरुस्ती कधी होणार, हा प्रश्‍न यानिमित्ताने विचारला जात आहे. ओढे, नाले आणि पावसाळी गटारांची देखभाल- दुरुस्तीची कामे पावसाळ्याआधी महिनाभर संपविण्याची घोषणा महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी केली जाते. ती यंदाही झाली; परंतु, त्यानुसार कामे झाली नसल्याचे उघडकीस आले आहे. 

उशिराने का होईना, पण खडबडून जागे झालेल्या महापालिका आयुक्तांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करीत, ओढे- नाले आणि पावसाळी गटारांची पाहणी करून ४८ तासांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. तसेच, आवश्‍यक ती कामे तातडीने हाती घ्यावी, त्यानंतर नाले तुंबल्याचे आढळून आल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला. त्यानंतर आदेशाचे पालन म्हणून ओढे- नाल्यांची पाहणी करण्यात आली. १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर पाहणीचा सोपस्कारही पूर्ण केला जात असून प्रत्यक्षात कामे केली जात नसल्याचेच बुधवारीही दिसून आले.

‘ड्रेनेज’ची सफाई झालीच नाही
पहिल्याच पावसात सांडपाणी वाहिन्यांतील पाणी रस्त्यांवर आल्याने या वाहिन्यांची (ड्रेनेज) देखभाल- दुरुस्ती झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या वाहिन्यांमधील गाळ काढण्यात आला नसल्याचे अधिकाऱ्यांनीच निदर्शनास आणून दिले. शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सांडपाणी वाहिन्यांमधील पाणी रस्त्यांवर आल्याने अनेक भागांत दुर्गंधी पसरली आहे. सांडपाणी वाहिन्यांची कामे अर्धवट झाली असून, त्यातील गाळ काढण्यात आला नाही. त्यामुळेच पाणी रस्त्यांवर येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पाहणीचा अहवाल आज सादर
सध्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत त्या-त्या भागातील ओढे, नाले आणि पावसाळी गटारांच्या कामांची पाहणी करण्यात येत आहे. त्यासाठी विविध खात्यातील अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून पाहणीचा अहवाल गुरुवारी (ता. १५) महापालिका आयुक्तांना देण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सर्व भागांतील ओढे, नाले आणि पावसाळी गटारांची पाहणी करण्यात येत आहे. बहुतेक भागातील पावसाळी कामे केली आहेत, तरीही काही भागातील नाल्यांची दुरवस्था झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार आवश्‍यक ती कामे केली जातील. पाहणीचा एकत्रित अहवाल आयुक्तांना देण्यात येणार आहे.
- विजय दहिभाते, उपायुक्त, महापालिका

‘निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा’
नाले सफाई निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे संपूर्ण शहराला नाल्याचे स्वरूप येत आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली. या कामांसाठी फेरनिविदा काढावी, असेही ते म्हणाले. तुपे म्हणाले, ‘‘शहरातील ओढे, नाले आणि पावसाळी गटारांची कामे गांभीर्याने केली जात नसल्याने अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचत आहे. काही पावसाळी गटारे तर चक्‍क गायब झाली आहेत. ठेकेदारांना सफाईची कामे दाखविण्यापुरतीच केली असून, पुणेकरांचा पैसा ठेकेदारांच्या घशात घातला जातो आहे. यासंदर्भात संबंधित ठेकेदारांवर कडक कारवाई करावी.’’बाजारपेठांच्या भागातील रस्त्यांची बांधणी चुकीच्या पद्धतीने केली असून, नव्या रस्त्यांवर कुठेही पाणी साठणार नाही, याची हमी ठेकेदारांकडून घेतलेली नाही. त्यामुळे पाणी साचलेल्या रस्त्यांची कामे ठेकेदारांकडून पुन्हा करून घ्यावीत, अशी मागणी नगरसेवक योगेश ससाणे यांनी केली.

Web Title: pune news dranage watching