उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

"एज्युकॉन' परिषद आजपासून सिंगापूरमध्ये; देशभरातील शिक्षणतज्ज्ञांचा समावेश

"एज्युकॉन' परिषद आजपासून सिंगापूरमध्ये; देशभरातील शिक्षणतज्ज्ञांचा समावेश
पुणे - भारतातील उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांबरोबरच उच्चशिक्षण क्षेत्रात आवश्‍यक असणाऱ्या बदलांवर चर्चा घडवून आणणाऱ्या "एज्युकॉन 2017' परिषदेला शुक्रवारपासून (ता. 8) सिंगापूर येथे सुरवात होत आहे. उच्चशिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणून उच्चशिक्षण क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या विविध मुद्द्यांवर चर्चा घडवून नव्या दिशा शोधण्याचा प्रयत्न करणारी ही परिषद "सकाळ माध्यम समूह' गेल्या बारा वर्षांपासून आयोजित करीत आहे. "उच्चशिक्षण क्षेत्रासमोरील बदलांचे आव्हान' ही यंदाच्या "एज्युकॉन'ची संकल्पना आहे.

"सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे.

परिषदेतील चर्चासत्रांनंतर सर्व प्रतिनिधी सिंगापूर येथील नानयांग टेक्‍नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीलाही भेट देणार आहेत. गेल्या वर्षी इस्राईलमधील तेल अविव येथे "एज्युकॉन' परिषद घेण्यात आली होती. "इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप' अशी या परिषदेची संकल्पना होती. या आधी कार्ल्सऱ्हू (जर्मनी), पॅरिस (फ्रान्स), इस्तंबूल (तुर्कस्तान), शांघाय (चीन), कोलंबो (श्रीलंका), दुबई आदी परिषदांमध्ये देशातील शिक्षणतज्ज्ञांनी उच्चशिक्षणाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्याबरोबरच त्या त्या देशांमधील नामवंत विद्यापीठांना, तसेच उद्योगांशी संबंधित संस्थांना भेटी दिल्या होत्या.

एज्युकॉनची तपपूर्ती
शिक्षण, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रांमधल्या तज्ज्ञांना एकत्र आणून त्यांच्यात संवाद घडवण्यासाठी "सकाळ माध्यम समूहा'ने बारा वर्षांपूर्वी "एज्युकॉन' ही राष्ट्रीय कुलगुरू परिषद भरविण्यास सुरवात केली. यंदा "एज्युकॉन'ची तपपूर्ती होत असताना या परिषदांनी देशातल्या उच्चशिक्षण क्षेत्रात स्वतःचे एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे.

आतापर्यंत झालेल्या परिषदांमधून उच्चशिक्षण आणि उद्योग यांच्यातील परस्पर सहकार्याचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. आज परदेशी विद्यापीठांबरोबर खासगी विद्यापीठेही स्पर्धेत उतरली आहेत. या पार्श्‍वभूमीवर दर्जेदार, कालसुसंगत आणि उत्पादक शिक्षणासाठी पारंपरिक विद्यापीठांनी बदलणे गरजेचे आहे. "एज्युकॉन'च्या आयोजनामागे ही भूमिका आहे. "बदलांचे आव्हान' ही यंदाच्या वर्षी सिंगापूरमध्ये होणाऱ्या "एज्युकॉन'ची मध्यवर्ती कल्पना आहे.

सिंगापूरमधील उच्चशिक्षण क्षेत्राने गेल्या दोन दशकांमध्ये यशस्वीपणे या बदलांचा मागोवा घेतला आहे. भारतातील विद्यापीठे बदलांच्या आव्हानाला सामोरी जात असताना सिंगापूरमध्ये होणारे हे विचारमंथन उपयोगी ठरेल, असा मला विश्‍वास वाटतो.
- प्रतापराव पवार, "अध्यक्ष' सकाळ

उच्चशिक्षणाच्या गुणवत्तेविषयी वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या "सकाळ एज्युकॉन'ने शिक्षण क्षेत्रात आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. सिंगापूरने गेल्या दोन दशकांच्या कालावधीत उच्चशिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले आहेत. शिक्षण संस्थांची स्वायत्तता, मूल्यांकन, प्राध्यापकांची गुणवत्तावाढ, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यातून सिंगापूरने हा बदल घडवून आणला आहे. यातील काही बदलांबाबतही या परिषदेत चर्चा होणार आहे.
- डॉ. संजय धांडे, अध्यक्ष, नियामक मंडळ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग, माजी संचालक, आयआयटी, कानपूर

या विषयांवर होणार चर्चा
- भारतातील शिक्षणपद्धतीतील परिवर्तन
- शिक्षणसंस्थांची स्वायत्तता आणि मूल्यांकन
- पायाभूत आणि डिजिटल सुविधा
- कौशल्यविकास आणि शिक्षण
- अध्यापक आणि विकास
- सिंगापूर प्रयोग
- आंतरराष्ट्रीय सहकार्य
- अध्ययन आणि अध्यापनाचे मूल्यमापन

Web Title: pune news ducon conferance 2017 in singapur