ई-लिलावातून तीन गावे वगळली

ई-लिलावातून तीन गावे वगळली

पुणे - महापालिका हद्दीलगतच्या ३४ गावांपैकी पहिल्या टप्प्यात ११ गावे महापालिकेत सामावून घेण्यासाठीचा निर्णय राज्य सरकारने घोषित केला. दरम्यान, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) त्यांच्या हद्दीतील शासकीय जमिनी शाळा आणि हॉस्पिटलच्या वापरासाठी भाडेतत्त्वावर देण्यासाठी ‘ई-लिलाव’ सुरू केला होता. परंतु या अकरा गावांमधून फुरसुंगी, लोहगाव आणि बावधन ही तीन गावे वगळण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाकडून पीएमआरडीएच्या हद्दीतील अकरा गावांमधील दहा मोकळ्या जागा (ॲमेनिटी स्पेसेस) हस्तांतरित केल्या आहेत. त्या जागा दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर देऊन त्यातून निधी उभारणीसाठी ‘ई-लिलाव’बाबत नगरविकास खात्याची परवानगी घेण्यात आली. त्यानुसार शाळा आणि हॉस्पिटलच्या वापरासाठी या जागांचा लिलाव सुरू करण्यात आला. या दहा जागा मुंढवा, मांजरी, लोहगाव, उंड्री, पिसोळी, हिंजवडी, बावधन, म्हाळुंगे आणि वाघोली येथील आहेत. परंतु यापैकी फुरसुंगी, लोहगाव आणि बावधन ही गावे महापालिकेत समाविष्ट केल्यामुळे त्या ठिकाणच्या जागा राज्य सरकारने ई लिलावमधून वगळल्या आहेत. या लिलावात जागांची चालू बाजारभावानुसार (रेडीरेकनर) बोली लावली जाणार आहे. त्यातून जवळपास ५० कोटींपेक्षा जास्त महसूल पीएमआरडीएला मिळणे अपेक्षित आहे.

आणखी जागांचे लिलाव
ज्या संस्था किंवा व्यक्तींना जागा भाडेतत्त्वावर हवी आहे, त्यांनी ई-लिलावमध्ये सामील व्हावे. रेडीरेकनरनुसार त्या जागांच्या भाड्यापोटी जी रक्कम होईल ती पीएमआरडीएकडे भरावी. या जागा ‘टायटल व्हेरिफिकेशन’करून दीर्घकालीन भाडेतत्त्वावर दिल्या जातील. बहुतांश जागा ॲमेनिटी स्पेसेसमध्ये संपादित झाल्यामुळे मोक्‍याच्या ठिकाणांवरील आहेत. यातून पीएमआरडीएसाठी निधी उभारला जाणार आहे. आगामी काळात पीएमआरडीएच्या हद्दीतील आणखी काही गावांमधील जागांचे लिलाव होणार असल्याचेदेखील पीएमआरडीएचे महानगर आयुक्त गित्ते यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com