विद्यापीठात सायकलपाठोपाठ ई-रिक्षाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

पुणे - ‘‘स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांकरिता सायकल योजनेपाठोपाठ येत्या महिनाभरात ई-रिक्षाही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास विद्यापीठात येणाऱ्या एका मार्गावर पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनांना बंदी घालण्यात येईल,’’ असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी मंगळवारी सांगितले. स्मार्ट सिटीचा भाग म्हणून विद्यापीठही स्मार्ट होईल, अशी आशाही डॉ. करमळकर यांनी व्यक्त केली. 

पुणे - ‘‘स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांकरिता सायकल योजनेपाठोपाठ येत्या महिनाभरात ई-रिक्षाही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास विद्यापीठात येणाऱ्या एका मार्गावर पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनांना बंदी घालण्यात येईल,’’ असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी मंगळवारी सांगितले. स्मार्ट सिटीचा भाग म्हणून विद्यापीठही स्मार्ट होईल, अशी आशाही डॉ. करमळकर यांनी व्यक्त केली. 

स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत पुणे स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी, विद्यापीठ आणि झूमकार यांच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या सायकल योजनेचे उद्‌घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. करमळकर बोलत होते. आमदार विजय काळे, मेधा कुलकर्णी, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजेंद्र जगताप, वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. एस. डी. शाळिग्राम यांच्यासह या भागातील नगरसेवक उपस्थित होते. विद्यापीठाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनीही मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमानंतर लगेचच विद्यार्थ्यांनी सायकलींचा वापर सुरू केला.

डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या आवारात सायकलींचा वापर करण्याची योजना ‘स्मार्ट सिटी’चा भाग आहे. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे. ज्यामुळे त्याची व्याप्ती वाढेल. सायकलींचा चांगला वापर झाला पाहिजे. तसे झाल्यास योजनेचा मूळ उद्देश साध्य होईल. विद्यापीठ अधिक स्मार्ट करण्याचे नियोजन सुरू आहे. त्याकरिता केंद्र सरकारकडून सुमारे १ हजार कोटी रुपये मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येतील.’’

स्मार्टसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या वर्षभरात विद्यापीठ खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ करण्याचे नियोजन असल्याचे जगताप यांनी सांगितले.

सायकलींचे शहर अशी पुणे शहराची पूर्वी ओळख होती. कालांतराने पुसट झालेली ही ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल. स्मार्टसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना राबविता येतील. त्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येतील. विद्यापीठाचा परिसर पर्यावरणपूरक ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यातूनच सायकल योजनेला प्रोत्साहन देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. महापालिका आणि विद्यापीठाच्या वतीने विशिष्ट अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.
- मुक्ता टिळक, महापौर 

पुणे शहराची स्थिती दिल्लीसारखी करायची नाही. त्यासाठी सायकल योजना महत्त्वाची असेल. अशा योजनांना संबंधित घटकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. या योजना राबविण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल.
-मेधा कुलकर्णी, आमदार

पैशाची बचत अन्‌ व्यायामही
विद्यापीठात सायकलसेवेचे उद्‌घाटन झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करून सायकल वापरण्यास सुरवात केली. ही सेवा सुरू केल्याबद्दल समाधानही व्यक्त केले आहे. सुधाकर सत्पाल आणि प्रकाश राठोड हे विद्यार्थी म्हणाले, ‘‘विद्यापीठात जागोजागी फिरण्यासाठी सायकल उपलब्ध झाल्याने विविध विभागांमध्ये फिरणे सोयीचे होणार आहे. यापूर्वी पायी किंवा गाडीवरून जावे लागत होते. पण आता सायकल मिळाल्याने पैसे तर वाचतीलच शिवाय व्यायामदेखील होईल.’’ सध्या या सेवेसाठी अर्ध्या तासाला एक रुपया घेतला जातो. ही रक्कम कमी करावी, अशीही विद्यार्थ्यांची मागणी आहे.

Web Title: pune news E-rickshaw bicycle smart city student