आकर्षक, प्रभावी, अभ्यासू  व्यक्तिमत्त्व मिळवते संधी

बुधवार, 26 जुलै 2017

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी हा निर्णय घेण्याएवढा परिपक्व झालेला असतो. त्यामुळे करिअरचा मार्ग निवडत असताना तो निर्णय घेऊ शकत असला, तरी त्यात चिकित्सकपणादेखील महत्त्वाचा आहे. त्यासाठी पदवीपासूनच कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, याचा विचार त्याने सुरू केला पाहिजे. यातून भविष्याची नेमकी दिशा आणि करिअरचे योग्य लक्ष्य त्याला साधता येऊ शकते. त्यासाठी कलचाचणी करून घेणे उपयुक्त ठरू शकते.

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी हा निर्णय घेण्याएवढा परिपक्व झालेला असतो. त्यामुळे करिअरचा मार्ग निवडत असताना तो निर्णय घेऊ शकत असला, तरी त्यात चिकित्सकपणादेखील महत्त्वाचा आहे. त्यासाठी पदवीपासूनच कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, याचा विचार त्याने सुरू केला पाहिजे. यातून भविष्याची नेमकी दिशा आणि करिअरचे योग्य लक्ष्य त्याला साधता येऊ शकते. त्यासाठी कलचाचणी करून घेणे उपयुक्त ठरू शकते.

कोणत्याही शाखेतील पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेताना अनेक जण अध्यापन क्षेत्राचा विचार करतात. या शिवाय संशोधन आणि खासगी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्येदेखील चांगल्या संधी असतात. खासगी कंपन्यांचेदेखील संशोधन प्रकल्प असतात, त्या ठिकाणी संधी मिळू शकते. शिक्षण घेता घेता स्पर्धा परीक्षांची तयारी करून सरकारी नोकरीचे ध्येय गाठता येऊ शकते. मात्र, आपल्याला कुठे जायचे आहे, कोणते क्षेत्र निवडायचे, हे आधीच चिकित्सकपणे ठरवावे लागेल.

शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव याबाबत म्हणाले, ‘‘एमए, एमकॉम, एमएस्सी या पदव्युत्तर परीक्षा दिल्यानंतर नेट-सेटद्वारे करिअरला निश्‍चित दिशा मिळू शकते. या परीक्षांत पात्र ठरल्यावर अध्यापन क्षेत्र खुले होते. गुणवत्ता सिद्ध केल्यास प्राध्यापक वा संशोधक म्हणून काम करता येते. अध्यापन क्षेत्रातच करिअर करायचे असेल, तर त्यासंबंधीची कौशल्येदेखील आत्मसात करावी लागतील.’’

मार्केटिंगमध्ये अनेक संधी
पदव्युत्तर पदवीनंतर मार्केटिंग हेदेखील एक करिअर असते. त्यासाठी आपली प्रकृती योग्य आहे का, याचादेखील विचार विद्यार्थ्याला करावा लागतो. एमए आणि एमकॉम करताना मोकळा वेळ विद्यार्थ्यांकडे असतो. त्याचा फायदा घेऊन ते स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकतात. त्यातून विविध सरकारी खात्यांमध्ये अधिकारी पदावर नोकरी मिळविता येते. त्यासाठी अभ्यास करून चौफेर ज्ञान मिळविण्याचे कष्ट मात्र घ्यावे लागतील. अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनादेखील ही संधी आहेच, असे डॉ. झुंजारराव म्हणाले.

अंगी कोणतीही कला असेल, तर त्या-त्या क्षेत्रातील संधीचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केल्यास करिअरच्या असंख्य वाटा समोर येतील. केवळ पदवी वा त्यापुढेही शिक्षण घेतले म्हणजे करिअर झाले असे नाही; तर शिक्षण घेतानाच व्यक्तिमत्त्व, सर्जनशीलता, चौकटीबाहेरचा विचार करण्याचा दृष्टिकोनाचा अंगभूत गुणांचा विकास करण्यावर भर दिला पाहिजे. यामुळे व्यक्तिमत्त्व पैलूदार वा सर्वांगाने समृद्ध होऊन करिअला नवा आयाम मिळू शकतो.
- डॉ. दिलीप नंदनवार,सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय

Web Title: pune news education