राज्यस्तरीय बालशिक्षण तंत्र व तंत्रज्ञान परिषदेचे आयोजन

रमेश मोरे
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

दरवर्षी परिषदेतर्फे बालशिक्षण हा केंद्रबिंदू ठेवून एक राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येते. या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून बालशिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणारे  कार्यकर्ते, शिक्षक, संस्थाचालक, पालक, स्वखर्चाने उपस्थित राहतात. यावर्षीचे हे अधिवेशन 'संस्कृती हॉल' नवी सांगवी, पुणे येथे होणार आहे.

पुणे : बालशिक्षण परिषदेच्या वतीने 'बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान' या विषयावर येत्या शुक्रवारपासून तीन दिवसीय राज्य अधिवेशनाचे २७ ते २९ ऑक्टोबर आयोजन करण्यात आले असून अधिवेशनाचे उद्‌घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ज्‍येष्ठ बालशिक्षणतज्‍ज्ञ प्रा. रमेश पानसे, म.बा.शि.प. कार्याध्यक्ष डॉ. दिनेश नेहेते, सांगवी केंद्राच्या अध्यक्ष मेघना बाक्रे, कार्याध्यक्ष नझीर जमादार, त्रिवेणी पावसे, नीता सणस आदी उपस्थित होते. 

दरवर्षी परिषदेतर्फे बालशिक्षण हा केंद्रबिंदू ठेवून एक राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येते. या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून बालशिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणारे  कार्यकर्ते, शिक्षक, संस्थाचालक, पालक, स्वखर्चाने उपस्थित राहतात. यावर्षीचे हे अधिवेशन 'संस्कृती हॉल' नवी सांगवी, पुणे येथे होणार आहे. या अधिवेशनासाठी 'बालशिक्षणाचे तंत्र व तंत्रज्ञान' हा महत्वाचा विषय निवडण्यात आलेला आहे. या विषयावर अनेक शिक्षक, संस्थाचालक, कार्यकर्ते शोधनिबंध सादर करणार आहेत, अधिवेशनाचे स्वरूप पूर्णपणे बौद्धिक स्वरूपाचे असून, शैक्षणिक साहित्य आणि पुस्तकांचे प्रदर्शन हा ही एक महत्वाचा भाग असेल.

या अधिवेशनासाठी  मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे प्रकाश जावडेकर यांनी व्हिडिओद्वारे शुभसंदेश पाठवलेला आहे. उद्घाटनासाठी वसुधा कामत, माजी कुलगुरू एस्.एन्.डी.टी. विद्यापीठ तसेच पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी बजरंग आवारी, महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या अध्यक्षा अलका बियाणी उपस्थित राहणार आहेत.

दुपारच्या सत्रात गुणवत्तावाढ आणि कार्यसुलभतेसाठी तंत्रज्ञान - संस्थाचालकांचे अभिनव प्रयोग या विषावरील चर्चासत्र होणार असून त्‍यास शिवाजी माने, कोल्‍हापूर येथील नीतू बावडेकर, जयश्री घाटगे आदी सहभागी होणार आहेत. तसेच ग्राममंगलचे प्रसाद मणेरीकर यांचे व्याख्यान, बालशिक्षणाची वाटचाल याविषयावरील चर्चासत्रात प्रसाद जोशी, नेहा जमदग्नी, मंगला जोशी आदी सहभागी होणार आहेत. शनिवार(ता.२८ऑक्टोबर) शोधनिबंध वाचन यामध्ये तंत्रज्ञान पर्यायी नव्हे, पूरक साधन याविषयावर चित्ररेखा जाधव, सुरेखा सोनार, रोहिणी घोंगडे आदी सहभागी होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज मीठभाकरे असतील. त्‍यानंतरच्या सत्रामध्ये मृदुला धोंगडे, संजय अष्टेकर, वैशाली सूर्यवंशी, यांच्या शोधनिबंधाचे वाचन तर लोणावळा येथील मनःशक्‍ती केंद्राचे प्रमोद शिंदे यांचे व्याख्यान, दुपारच्या सत्रात नीलेश निमकर यांच्या अध्यक्षतेखाली तंत्रज्ञान वापर-इतरांचे प्रयोग-आपले शिक्षण याविषयावरील शोधनिबंध सादर होतील रेखा पाटील, नितीन माळी, रुपाली पाटील हे यामध्ये सहभागी होतील. 

अधिवेशनाचा समारोप रविवारी होईल. या कार्यक्रमास राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आणि महाराष्ट्र ज्ञानमंडळाचे व्यवस्थापक श्री. विवेक सावंत उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनातील उपस्थित सदस्यांसाठी निवास, भोजन व्यवस्था तसेच संपूर्ण जागा व कार्यक्रमव्यवस्था यासाठी  छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या सांगवीतील शिक्षणसंस्थेने प्रायोजकत्व घेतेलेले आहे. सर्व शिक्षणप्रेमींनी तीनही दिवस अधिवेशनास उपस्थित राहून या विषयातील शिक्षणविषयक नवीन माहिती घ्यावी आणि बालशिक्षणाचे स्वरूप शास्त्रीयपद्धतीचे होण्यासाठी जमेल ते कार्य करून या चळवळीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रशांत शितोळे, प्रा. रमेश पानसे तसेच कार्यक्रमाच्या संयोजकांनी केले आहे.

महाराष्ट्र बालशिक्षण ही संस्था १९९४ साली स्थापन झाली. या संस्थेचे कार्य बालशिक्षणाचा शास्त्रीय विचार जनतेपुढे आणणे हे आहे. बालशिक्षण परिषद जनजागृतीचे कार्य, गेली २४वर्षे सातत्याने करीत आहे. प्रकाशन, प्रशिक्षण, प्रदर्शन आणि व्याख्यानाद्वारे समाजातील सर्व घटकांना बालशिक्षणाची शास्त्रीय माहिती देण्याचा परिषद प्रयत्न करीत आहे, असे प्रा. पानसे यांनी सांगितले.

Web Title: Pune news education conference