अभियांत्रिकीकडे यंदाही काणाडोळा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

पुणे विभागातील स्थिती 
पदवी अभ्यासक्रम एकूण जागा यंदाचे अर्ज 
बीई/बीटेक 42000 24903 
फार्मसी 3870 11080 
हॉटेल मॅनेजमेंट 270 440 
वास्तुकला 2090 1638 
एमबीए 17100 14158 
एमसीए 3795 2129 

पुणे - अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी यंदाही काणाडोळा केला आहे. या अभ्यासक्रमाच्या एकूण जागेत घट होण्याबरोबर अर्जांची संख्याही कमी झाली आहे. यंदा अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षासाठी एक लाख 20 हजार 953 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. 

गेल्या वर्षी या अभ्यासक्रमासाठी एक लाख 47 हजार जागा होत्या. त्या घटून एक लाख 40 हजार वर आल्या. औषधनिर्माणशास्त्र पदविका आणि पदवी या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा विशेष कल तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. पुरेशी विद्यार्थिसंख्या मिळत नसल्याने ग्रामीण भागातील अभियांत्रिकी महाविद्यालये काही अभ्यासक्रम बंद करण्यास प्राधान्य देत असल्याचे अधिकारी सांगतात. 

अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकी महाविद्यालयातील पायाभूत सुविधांची तपासणी केली. त्यानंतर संस्थांना अभ्यासक्रम बंद करण्याचे प्रस्ताव दिले होते. काही महाविद्यालयांत दुसऱ्या पाळीतही अभ्यासक्रम चालविले जातात. त्यावरही बंधने आल्याने अनेक ठिकाणी ते बंद झाले आहेत. तसेच, विद्यार्थिसंख्येअभावी महाविद्यालये बंद होत असल्याचे सहसंचालक डॉ. दिलीप नंदनवार यांनी सांगितले. 

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या जागाही कमी होण्याची शक्‍यता डॉ. नंदनवार यांनी वर्तविली आहे. पदविका चालविणाऱ्या संस्थांनी इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान हे अभ्यासक्रम बंद करण्याचे प्रस्ताव दिले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पदविकेच्या जागाही कमी होऊ शकतात, असा अंदाज डॉ. नंदनवार यांनी वर्तविला आहे. 

फार्मासिस्ट पदविकेकडे ओघ 
औषधांच्या दुकानांमध्ये फार्मासिस्ट सक्तीचा झाल्याने या पदविकेला ओघ वाढला. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही रोजगार आणि नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. औषधांची निर्यात वाढल्याने त्या-त्या देशातील कायदेविषयक ज्ञान असलेले मनुष्यबळ लागते. तसेच रुग्णसेवा आणि औषधांचे प्रतिकूल परिणाम शोधण्यासाठी मनुष्यबळ लागते. रुग्णालयांतही क्‍लिनिकल फार्मासिस्ट म्हणून मागणी वाढत असल्याने या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचे कल आहे. 
- डॉ. आत्माराम पवार, उपप्राचार्य, पूना कॉलेज ऑफ फार्मसी 

Web Title: pune news education Engineering courses