'वाचन संस्कृती'साठी 2,969 ग्रंथालये घेणार परीसरातील शाळा दत्तक

श्रीकृष्ण नेवसे
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

राज्यात सर्वप्रथमतः सोलापूर जिल्ह्यात ग्रथालय विभागाचे जिल्हा प्रमुख या नात्याने श्री. क्षीरसागर यांनी तिथे ग्रंथालयाने आशा शाळा, कनिष्ठ महाविद्यालये दत्तक घेण्याची योजना राबविली व ती यशस्वी केली. आता श्री. क्षीरसागर हे ग्रंथालय विभागाचे सहायक संचालक म्हणून पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यांच्या पुणे विभागासाठी आले आहेत.

सासवड : पुणे विभागातील पाच जिल्ह्यातील सुमारे 2,969 सार्वजनिक ग्रंथालयांव्दारे वाचन संस्कृतीसाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये दत्तक घेतली जाण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. त्याचाच भाग म्हणून साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी सासवड (ता. पुरंदर) ला अत्रे ग्रंथालयाने येथील हजार विद्यार्थी मोफत सभासद करुन व त्यांना पुस्तके देऊन शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आज दत्तक घेतले आहे. हे काम विभागात जोमाने होईल., असे प्रतिपादन शासनाच्या ग्रंथालय विभागाचे सहायक संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांनी येथे केले. 

राज्यात सर्वप्रथमतः सोलापूर जिल्ह्यात ग्रथालय विभागाचे जिल्हा प्रमुख या नात्याने श्री. क्षीरसागर यांनी तिथे ग्रंथालयाने आशा शाळा, कनिष्ठ महाविद्यालये दत्तक घेण्याची योजना राबविली व ती यशस्वी केली. आता श्री. क्षीरसागर हे ग्रंथालय विभागाचे सहायक संचालक म्हणून पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यांच्या पुणे विभागासाठी आले आहेत. त्यामुळे त्यांनी 12 आॅगस्टपासून ही योजना व्यापकपणे हाती घेतली आहे. ती विस्ताराने राबविली जात आहे., असे त्यांनी सांगितले. `वाचन संस्कृती` वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या शाळा दत्तक योजना अंतर्गत सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानांतर्गत अत्रे सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने सासवड (ता. पुरंदर) येथील पुरंदर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयास ग्रंथवाचनाच्या दृष्टीने आज एका कार्यक्रमाव्दारे दत्तक घेण्यात आले.

त्यावेळी श्री. क्षीरसागर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते होते. यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालय संगाचे कार्यवाह सोपानराव पवार, संचालक दत्तात्रेय कड, चंद्रकांत टिळेकर, बंडुकाका जगताप, दशरथ यादव, ख्वाजाभाई बागवान, प्राचार्य एच. ए. मुजावर, शासनाच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी उज्ज्वला लोंढे, नितीन बढे, पुरंदर तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नामदेव झुरंगे, नितीन यादव, श्रीकृष्ण नेवसे आदी मान्यवर व शिक्षक, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक संकुल दत्तक घेतल्याबद्दल अत्रे ग्रंथालयाच्या नूतन सभासद विद्यार्थ्यांना प्रातिनीधीक स्वरुपात पुस्तके वितरीत करण्यात आली.  

यावेळी कोलते म्हणाले, पूर्वी वाचनालये, ग्रंथालये याकडे पाय वळत होते. आता दूरचित्रवाणीच्या प्रचंड वाहीन्या, सोशल मिडीया यांच्या लाटेत जीवनशैली बदलली. त्यामुळे वाचन चळवळ पुन्हा नव्या जोमाने रुजावी, हा या ग्रंथालयांनी शाळा दत्तक घेण्याच्या वेगळ्या उपक्रमामागील उद्देश आहे. अभ्यासक्रमाशिवाय आवांतर वाचन केले तरच स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकतील. त्याला पाठबळ म्हणूनच या उपक्रमाचा लाभ घ्यावा. यावेळी दत्तात्रेय कड यांनी तालुक्यातील सर्व 22 ग्रंथालये शाळा दत्तक घेतील., असे स्पष्ट केले. सोपानराव पवार, दशरथ यादव यांनीही मनोगत मांडले. प्राचार्य श्री. मुजावर यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन चंद्रकांत टिळेकर यांनी केले. तर आभार बंडुकाका जगताप यांनी मानले. 

Web Title: Pune news education in Saswad