धूलिकणांचा अर्भकांवरही परिणाम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

हवेतील प्रदूषित घटकांचा माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. हवा शुद्ध ठेवणे हाच हवेतून होणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी हवेची शुद्धता वाढविणाऱ्या सवयी आणि जीवनशैली आत्मसात केली पाहिजे.
- अरविंद छाब्रा, हवा शुद्धीकरणासाठी प्रयत्नशील

पुणे - जन्मत: येणारे व्यंग आणि प्रदूषण यांचा जवळचा संबंध असल्याचे धक्कादायक तथ्य नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. गर्भधारणापूर्व एक महिना आणि गर्भधारणेनंतर एक महिन्यात प्रदूषणाशी संबंध आल्यास जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये व्यंग निर्माण होऊ शकते, असे ‘जर्नल ऑफ पिडियाट्रिक’ या विज्ञानविषयक जर्नलमध्ये म्हटले आहे.

बालकांच्या आजारांशी संबंधित हा अंक नुकताच प्रसिद्ध झाला आहे. प्रदूषणामुळे जोडलेले ओठ, चिकटलेली टाळू किंवा व्यंग असलेले हृदय असे अर्भक जन्माला येऊ शकते, अशी धक्कादायक माहिती समोर आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात ओहिओ आरोग्य विभागाने दिलेल्या जन्म दाखल्यांची माहिती आणि यूएस पर्यावरण संरक्षण विभागाने दिलेली ५७ केंद्रांवरील धूलिकणांची माहिती यांचा एकत्रित अभ्यास करून मुलांच्या विकासावर प्रदूषणाचा होणारा परिणाम याचे विश्‍लेषण केले आहे. संशोधकांनी यातील प्रत्येक केंद्राचा स्वतंत्र अभ्यास केला. यातील मातांच्या घराभोवती असणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाणही लक्षात घेतले. या अभ्यासातून मुलांमधील व्यंग आणि हवेतील धूलिकण यांचा गर्भवतींच्या आरोग्यावर होणारा परिणाम दिसून आला आहे.

या आधारे केले विश्‍लेषण
ओहिओ आरोग्य विभागाने दिलेल्या जन्म दाखल्यांची माहिती
यूएस पर्यावरण संरक्षण विभागाने दिलेली ५७ केंद्रांवरील धूलिकणांची माहिती
मातांच्या घराभोवती असणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाणही घेतले लक्षात

शहरी भागात कोंदटलेली हवा, धूळ आणि हवेतील प्रदूषित कणांमुळे श्‍वसनासाठी आवश्‍यक हवेची गुणवत्ता ढासळली आहे. मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि श्‍वसनाचा विकार असणाऱ्यांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे. गर्भवती महिलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम गंभीर स्वरूपाचा होतो. गर्भधारणेनंतर एका महिन्यात प्रदूषणाशी संबंध आल्यास जन्म घेणाऱ्या बालकामध्ये व्यंग निर्माण होऊ शकते, अशी शक्‍यता नुकत्याच झालेल्या संशोधनातून व्यक्त होत आहे. त्यामुळे आसपासची हवा शुद्ध ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
- पराग खटावकर, फुफ्फुस रोगतज्ज्ञ

Web Title: pune news effect of dust on born baby