वीजसेवेच्या तक्रारी करा टोल फ्री क्रमांकांवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पुणे - वीजसेवेबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी किंवा अन्य माहिती देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागांतील वीजग्राहकांनी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या 1912 किंवा 1800-200-3435 किंवा 1800-233-3435 या तीन टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ग्राहक सेवा केंद्रातील तीनही टोल फ्री क्रमांक चोवीस तास उपलब्ध राहणार आहेत.

पुणे - वीजसेवेबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी किंवा अन्य माहिती देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागांतील वीजग्राहकांनी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या 1912 किंवा 1800-200-3435 किंवा 1800-233-3435 या तीन टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ग्राहक सेवा केंद्रातील तीनही टोल फ्री क्रमांक चोवीस तास उपलब्ध राहणार आहेत.

कोणत्याही कंपनीच्या लॅंडलाइन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करता येते. यासोबतच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्‍यता आहे, अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना ग्राहक क्रमांकासोबत स्वतःचा मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक रजिस्टर्ड करण्याची सुविधा आहे. यानंतर रजिस्टर्ड केलेल्या मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांकावरून तक्रार नोंदविण्यासाठी कॉल सेंटरशी संपर्क साधल्यास फक्त तक्रारीचा तपशील सांगावा लागणार आहे. वीजग्राहकांनी वीजसेवेविषयक तक्रारी असल्यास 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

"एसएमएस'द्वारे घ्या माहिती
याशिवाय विविध ग्राहकसेवा "एसएमएस'द्वारे देण्यासाठी वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडून नोंदणी करण्यात येत आहे. वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झाल्यानंतर वीजबिलाचा तपशील, वीजपुरवठा बंद असल्याचा कालावधी किंवा देखभाल व दुरुस्तीच्या कालावधीची माहिती महावितरणकडून "एसएमएस'द्वारे पाठविण्यात येत आहे. महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर "एसएमएस'द्वारे वीजग्राहकांना मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाइप करून एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे.

आज वीजग्राहक तक्रार निवारण दिन
पुणे परिमंडलातील सर्व विभागीय कार्यालयांत बुधवारी (ता. 4 ) महावितरणच्या वतीने वीजग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले आहे.

वीजग्राहकांच्या प्रामुख्याने वीजबिल, नवीन कनेक्‍शन आदींसह वीजसेवेशी संबंधित तक्रारी त्वरित निकाली काढण्यासाठी सर्व विभाग कार्यालयांत या तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: pune news electricity service complaint on toll free number