मंडळांना 4 रुपये 31 पैसे प्रतियुनिटने वीज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

पुणे - गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी वहन आकारासह 4 रुपये 31 पैसे प्रतियुनिट या वीजदराने तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, तसेच उत्सवादरम्यान वीजसुरक्षेबाबतच्या सर्वतोपरी उपाययोजना गांभीर्याने कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.

पुणे - गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी वहन आकारासह 4 रुपये 31 पैसे प्रतियुनिट या वीजदराने तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, तसेच उत्सवादरम्यान वीजसुरक्षेबाबतच्या सर्वतोपरी उपाययोजना गांभीर्याने कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवाच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 10 पैसे अधिक 1 रुपया 21 पैसे वहन (व्हिलिंग) आकार व इंधन अधिभार, असे वीजदर आहेत. त्यानुसारच वरील वीजदर ठरविला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा अधिकृत वीज कंत्राटदारांकडून घ्यावी.

तातडीच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 1912 आणि 18002003435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर मांडव उभारून देखावा करावा.

गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्‍यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असेही महावितरणने म्हटले आहे.

Web Title: pune news electricity supply for ganeshotsav mandal