प्रवेशासाठी चौथी प्रवेश फेरी सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

पुणे - अकरावी प्रवेशासाठी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होऊनही ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला नाही. अशा विद्यार्थ्यांचा दहावीचे सीट नंबर व वर्ष ब्लॉक करण्यात आले आहे. चौथ्या फेरीसाठी या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार नाही. चौथी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठीचे प्रवेश प्रक्रियेबाबतचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. त्यामळे ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन माहितीपुस्तिका घेऊन नव्याने अर्ज करू नये, असे केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने स्पष्ट केले आहे.

यंदा अकरावीसाठी 92,430 जागांची प्रवेश क्षमता आहे. त्यानुसार 80,904 अर्ज आले होते. त्यापैकी 51,344 विद्यार्थ्यांनी तिसऱ्या फेरीअखेर प्रवेश घेतला. अद्यापही 29,560 विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बाकी असून, 41,046 जागा रिक्त आहेत. दरम्यान, गुरुवार (ता.3) पासून चौथी प्रवेश फेरी सुरू झाली. उद्या (ता.4) सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाचा भाग एक व दोन संकेतस्थळावर भरावा.

चौथ्या फेरीसाठी संकेतस्थळावर महाविद्यालयांतील रिक्त जागा, कटऑफ देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक अर्ज भरावा. याबाबत शिक्षण सहसंचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, 'चौथ्या फेरीत विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरता येईल. विद्यार्थ्यांनी सोईचे महाविद्यालय निवडावे. प्रत्येक महाविद्यालयातील रिक्त जागा पाहाव्यात. कटऑफ लक्षात घ्यावा. त्यानुसार पसंतीक्रमांकाप्रमाणे प्रवेश घेता येऊ शकेल. चौथी फेरी महत्त्वाची असल्याने विचारपूर्वक अर्ज भरावा.''

Web Title: pune news eleventh admission fourth round