अकरावीचा ऑनलाइन अर्ज होणार छोटा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पुणे - अकरावीसाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याचे तांत्रिक काम कमी होणार आहे. पुढील वर्षीपासून राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना अर्ज भाग एक म्हणजे वैयक्तिक माहितीचा अर्ज भरावा लागणार नाही.

पुणे - अकरावीसाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याचे तांत्रिक काम कमी होणार आहे. पुढील वर्षीपासून राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना अर्ज भाग एक म्हणजे वैयक्तिक माहितीचा अर्ज भरावा लागणार नाही.

अकरावीचा ऑनलाइन अर्ज भरताना त्याचे दोन भाग भरावे लागतात. पहिल्या भागात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती आणि दुसऱ्या भागात प्रवेश हवा असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरावे लागतात. विद्यार्थी परीक्षेचा अर्ज भरतो, त्या वेळी त्याची सर्व वैयक्तिक माहिती ऑनलाइन अर्जामध्ये असते. ती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे असते. अकरावीच्या अर्जाच्या भाग एकमध्येदेखील हीच माहिती भरावी लागते.

केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समिती विद्यार्थ्यांच्या गुणांची माहिती जशी मंडळाकडून ऑनलाइन पद्धतीने घेते, तसेच विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहितीदेखील घेणार आहे. यामुळे विद्यार्थ्याने त्याचा बैठक क्रमांक टाकला, की त्याची वैयक्तिक माहिती अर्जात आपोआप भरली जाईल. यामुळे अर्जाचा भाग एक भरण्याची तांत्रिक अपरिहार्यता विद्यार्थ्यांना पूर्ण करावी लागणार नाही. तसेच, समितीचे कामही सुलभ होणार आहे.

सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, 'प्रवेश अर्जाचे दोन भाग भरायचे असल्याने त्यासाठी पुरेसा कालावधी विद्यार्थ्यांना द्यावा लागतो. यामुळे प्रवेशप्रक्रियेचा कालावधी लांबतो. सध्या राज्य शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांचे गुण घेतले जातात, ते विद्यार्थ्यांना अर्जात भरावे लागत नाहीत. त्याच पद्धतीने पुढील वर्षीपासून विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहितीदेखील घेतली जाणार आहे. ही माहिती अर्जात आपोआप भरली जाईल. यातून प्रवेशप्रक्रियेचा कालावधी कमी होण्यास मदत होईल.''

'अकरावीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये राज्य मंडळाशी संलग्न शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते, त्यांची माहिती मंडळाकडून मिळविणे शक्‍य आहे. परंतु, सीबीएसईसह अन्य मंडळांशी संलग्न शाळांमधील विद्यार्थीदेखील प्रवेशासाठी अर्ज करतात, त्यांची ऑनलाइन माहिती मिळविणे अशक्‍य आहे. तरीही या मंडळांशी संपर्क करून माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत,'' असे राऊत यांनी सांगितले.

प्रवेश लटकला
पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची प्रवेशक्षमता 92 हजार 350 आहे. प्रत्यक्षात 57 हजार 147 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, 21 हजार 295 जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश ऑनलाइन प्रक्रिया संपली आहे. मात्र, या प्रक्रियेत आधी महाविद्यालय मिळूनही तिथे प्रवेश मिळाला नसल्याची पाच विद्यार्थ्यांची तक्रार आहे. यासंबंधी राऊत म्हणाल्या, ""प्रवेशाच्या शेवटच्या दिवशी या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले; पण प्रवेशाची लिंक बंद झाल्यानंतर हे विद्यार्थी संबंधित महाविद्यालयात गेले. त्यामुळे तिथे प्रवेश होऊ शकला नाही. आता ही सर्व प्रकरणे शासनाकडे पाठविली आहेत. त्यांच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल.''

Web Title: pune news eleventh online form small